आज निघणारी पालखी तूर्त स्थगित
शेगाव : राज्यभरात नव्हे तर संपूर्ण देशावर सध्या कोरोना विषाणूचे सावट आहे. यामुळे लॉकडाऊन च्या चौथ्या टप्प्यामध्ये पंढरपूर येथील वारी सोहळ्यामध्ये सहभागी होण्यासाठी जाणाऱ्या राज्यभरातील पालख्यांना शासनाने स्थगिती दिलेली आहे यामध्ये विदर्भाची पंढरी म्हणून मानल्या जाणाऱ्या श्री संत गजानन महाराजांची पालखी चा सुद्धा समावेश आहे. आज 28 मे रोजी ही पालखी नियोजितपणे शेगाव वरुन पंढरपूर साठी मार्गस्थ होणार होती मात्र मंदिर प्रशासनाने या पालखीला तूर्तास स्थगिती दिली आहे.
आषाढी वारीसाठी विदर्भातून पंढरपूरसाठी जाणारी सर्वात पहिली पालखी हि शेगाव येथील श्री संत गजानन महाराजांची भव्य-दिव्य पालखी. गजराज, घोडे असा भलामोठा अध्यात्मिक थाट घेऊन ही पालखी शेगाववरुन मार्गस्थ होते, तेव्हा खऱ्याअर्थाने वारीचे वेध वारकऱ्यांना लागतात. यंदा या वारीचे ५३ वे वर्ष, कधीही खंड पडणाऱ्या या अखंड पालखी सोहळ्यावर यावर्षी मात्र कोरोनाचे सावट असल्यामुळे या वारीविषयी संभ्रमावस्था अद्याप कायम होती. मात्र शेगाव संस्थांच्या नियोजनाप्रमाणे हि पालखी २८ मे म्हणजेच आज सकाळी निघणे क्रम प्राप्त होते मात्र आज संस्थांच्या वतीने पालखीला तूर्त स्थगित देण्यात आली आहे.
संपूर्ण देशभरात कोरोना विषाणूची लागण झाल्यानेवसर्वत्र लॉकडाऊन सुरू आहे. यामुळे पंढरपूरच्या आषाढी वारी बाबत संपुर्ण महाराष्ट्रातील विविध संस्थांनांच्या पालख्या, दिंड्या व वारकऱ्यांचे वारीचा निर्णय झालेला नाही. ३१ मे नंतर यासंदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक होऊन निर्णय घेतला जाणार आहे.
त्यामुळे शेगाव येथील श्री गजानन महाराज संस्थाननेही २८ मे रोजी निघणाऱ्या पंढरपूर वारी तूर्त स्थगित केली आहे. ३१ मे नंतर होणाऱ्या बैठकीत पंढरपूरच्या वारीबाबत राज्यभरातील वारकरी व विविध संस्थानांचा जो निर्णय होईल त्याप्रमाणे श्री गजानन महाराज संस्थान या वारीचा निर्णय घेणार असल्याचे समजते.