मुंबई : ऐतिहासिक चित्रपटांचं आकर्षण मराठी, हिंदी प्रत्येक चित्रपटसृष्टीला आहे. आपला गौरवशाली इतिहास, प्रेरणादायी व्यक्तिमत्त्वांचं चरित्र प्रेक्षकांसमोर मांडण्यासाठी आणि ते पाहण्यासाठी निर्माता, दिग्दर्शक आणि प्रेक्षकही उत्सुक असतो. असाच एक ऐतिहासिक चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. महाभारतातील एक वीर योद्धा कर्ण याच्या आयुष्यावर आधारित चित्रपट प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. या चित्रपटाचा टायटल लोगो नुकताच प्रदर्शित करण्यात आला आहे. या चित्रपटाचा निर्माता आणि अभिनेता जॅकी भगनानी याने आपल्या सोशल मिडीया अकाऊंटवरून हा लोगो शेअर केला आहे. यात भव्यदिव्य सेट, आकर्षक ग्राफिक्सचा वापर करत आहे. हा चित्रपट एक बिग बजेट चित्रपट असणार एवढं मात्र नक्की! या चित्रपटाचं अजून एक वैशिष्ट्य म्हणजे डॉ. कुमार विश्वास हे या चित्रपटाचे संवाद लिहित आहेत. कवितेच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहचलेले कुमार विश्वास हे पहिल्यांदाच चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवत आहेत. हा चित्रपट हिंदी , तामिळ, तेलुगू , कन्नड आणि मल्याळम या भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटातली कर्णाची भूमिका कोण करणार याबद्दल प्रेक्षकांची उत्सुकता आता चाळवली गेली आहे, एवढं मात्र नक्की! पण अद्याप या चित्रपटातल्या कलाकारांबद्दल काही माहिती मिळालेली नाही. या चित्रपटाचं लेखन आणि दिग्दर्शन आर.एस.विमल यांचं असून जॅकी भगनानी, वासू भगनानी आणि दीपशिखा देशमुख यांची ही निर्मिती आहे.
previous post