बोथा मार्ग वळविण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश
बुलडाणा : विदर्भाची वनपंढरी म्हणून ओळख असलेल्या ज्ञानगंगा अभयारण्यातून जाणाऱ्या रस्त्याच्या नुतनीकरण व मजबुतीकरणाच्या कामाला मान्यता मिळाली आहे. कंत्राटदाराने यासाठी ३० दिवसांचे नियोजन केले असून ३० जानेवारी ते २८ फेब्रूवारी दरम्यान बुलडाणा- बोथा- खामगाव मार्ग बंद करून हा मार्ग बुलडाणा- वरवंड- उंद्री- खामगाव या पर्यायी मार्गाने वळविण्यात आल्याचे आदेश आज जिल्हाधिकारी यांनी निर्गमित केले आहे. गेल्या कित्येक दिवसांपासून या रस्त्याचे काम संथगतीने सुरू होते. मात्र आता हा रस्ता बंद केल्यावर तरी या रस्त्याचे काम वेगाने होईल अशी नागरिकांमधे चर्चा आहे. खामगाव बुलढाणा मार्ग रात्री ९:३० ते सकाळी ६ पर्यंत बंद ठेवण्यात येत असतो,मात्र आता तीस दिवसांसाठी हा रस्ता बंद करण्यात आला आहे.त्यामुळे प्रशासनाने दिलेल्या पर्यायी मार्गाने प्रवाशांना प्रवास करावा लागणार आहे.