बुलडाणा : खामगाव येथे शहर पोलीस स्टेशन मधील कोविड 19 च्या काळात तत्परतेने कार्यरत असलेले अब्दुल सलाम यांना अचानक श्वास घेण्यास त्रास होत असल्याने बुलडाणा जिल्हा सामान्य रुग्णालयात भरती करण्यात आले होते. व्हेंटिलेटर ची सुविधा न मिळाल्याने त्यांचा मृत्यु झाल्याची घटना बुलडाणा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात घडली आहे. त्यांच्या मृत्युस सर्वस्वी जबाबदार जिल्हा सामान्य रुग्णालय प्रशासन असल्याचा आरोप मृतकाच्या नातेवाईकांनी केला आहे.
परवा रात्रीच्या सुमारास पोलीस अब्दुल सलाम यांना श्वास घेण्यास त्रास होत असल्याने त्यांना बुलडाणा जिल्हा सामान्य रुग्णालयात भर्ती करण्यासाठी घेऊन आले असता, तिथे व्हेंटिलेटर खाली नसल्याचे डॉक्टरांनी सांगितले, त्यामुळे ऑक्सीजन लावता आले नाही. तर खाजगी रुग्णालयात कोणतेही डॉक्टर भर्ती करुन घेण्यास तयार नव्हते, यावेळेस त्यांनी बुलडाणा येथील नगरसेवक मो अजहर यांना याची माहिती दिली व त्यांनी लगेच जिल्हा शल्य चिकित्सक पंडित यांना फोन करुन मदतीची मागणी केली, मात्र त्यांनी सुद्धा मदत देण्यास साफ नकार दिला. यावेळी नातेवाईकांनी अकोला येथील सामान्य रुग्णालयात घेऊन जाण्यासाठी अॅम्बुलन्स मागितली असता उपलब्ध नाही असे सांगण्यात आले त्यामुळे खाजगी अॅम्बुलन्सद्वारे अकोला रुग्णालयात घेऊन जात असताना बुलडाणा शहराच्या काही अंतरावरच त्यांचा मृत्यु झाला. पोलीस अब्दुल सलाम यांच्या मृत्युस जबाबदार असणाऱ्यावर कड़क कारवाई करावी, अशी मागणी त्यांच्या नातेवाईकांकडून होत आहे. तसेच पोलीस विभागाने मृतकाच्या कुटुंबास आर्थिक मदत करावी अशी मागणी नगरसेवक मो अजहर यानी केली आहे.