October 10, 2024
Featured मनोरंजन

मैत्री- बंध ; ४२ वर्षांनी उलगडला आठवणींचा पट..!

खामगांव (साक्षी गोळे) : आपण वयाने कितीही मोठे झालो, आपापल्या क्षेत्रात कितीही यशस्वी झालो तरी आपली शाळा आणि कॉलेजचे ते सोनेरी दिवस आपण कधीच विसरू शकत नाही. पण वेळ कुणासाठी थांबत नाही आणि मागे पडलेले दिवस पुन्हा येत नाहीत. पण ह्या सर्व आठवणी अमर असतात. समज आल्यापासून ते आज पर्यंत प्रत्येक गोष्टीची निवड आपण आपल्या आवडीनुसार आणि सोयीनुसार करत असतो. पण आपले आयुष्य घडवणाऱ्या आपल्या शाळेची निवड आपल्या आई-वडिलांनी त्यांच्या सोयीनुसार केलेली असते. आपल्या संपूर्ण आयुष्यात दिवसातले फक्त पाच-सहा तास तेही फक्त दहा बारा वर्षे आपण शाळा, कॉलेज मध्ये घालवलेले असतात आणि तरीही गंमत म्हणजे हे दिवस सर्वात सोनेरी दिवस आणि आयुष्यभरासाठीचा आनंदाचा ठेवा बनतात. ही काय जादू असते? अगदी लहान वयात सर्वस्वी अनोळखी दुनियेत पहिलं पाऊल टाकण्याची सुरक्षित जागा म्हणजे आपली शाळा आणि त्यानंतर  कॉलेज. 

हे दिवस कुतुहलांनी भरलेले असतात. आवडलेल्या गोष्टींचा सहजी स्वीकार आणि नावडत्याला थेट नकार ही ह्या वयातील खासियत! त्यामुळे सहज जुळलेली ती मैत्री खेळ, ते राग लोभ, त्या मारामाऱ्या, भांडणे, ते रुसवे फुगवे त्या नकळत्या वयातील उत्स्फूर्तता, अवखळपणा आणि आज असलेले मुखवटे चढवण्यापूर्वीचे ते खरेखुरे चेहरे सर्वकाही आजही हवेहवेसे वाटते. इतक्या वर्षांनंतरही पहिल्या पावसाच्या मातीचा सुगंध शाळा आणि कॉलेज ची आठवण करून व्याकुळ करून सोडतो. खरंच मैत्रीचे नाते हे रक्‍ताच्या नात्यापेक्षाही श्रेष्ठ आहे. कारण, खर्‍या मैत्रीमध्ये कोणतेही पाश नसतात, तसेच स्वार्थ आणि अप्पलपोटेपणादेखील नसतो. तिथे असते ते फक्‍त निर्मळ प्रेम आणि मित्रांसाठी कधीही, काहीही करण्याची तयारी! आयुष्याच्या प्रत्येक वळणावर, आपल्याला मैत्रीची विविध रूपे पाहावयास मिळतात. शाळेतील मैत्री ही निस्सीम, निरागस आणि बालिश असते, तर तरुणपणातील मैत्री ही अवखळ, उनाड, अपरिपक्‍व, तरीही सतत हवीहवीशी वाटणारी असते. कॉलेजविश्‍व आणि मित्र परिवार हे एकमेकांशिवाय अधुरे आहेत.
नंतर आपण जसजसे मोठे होत जातो, तसतशी आपली मैत्रीपण परिपक्‍व बनत जाते. मग सुख-दुःखात, अडीअडचणींत सर्वात पहिल्यांदा आठवतात ते म्हणजे मित्र आणी मैत्रिणी!
मात्र शाळा, कॉलेजचे दिवस संपले की प्रत्येकजण आपआपल्या करिअरसाठी वेगवेगळ्या क्षेत्राकडे धाव घेतो. मात्र, ज्या शाळेमध्ये, ज्या कॉलेजमध्ये आपण शिकलो, लहानाचे मोठे झालो, वेगवेगळ्या
भागातील विद्यार्थ्यांबरोबर आपण मैत्रीचे नाते जोडले त्या सर्वांना एकदा  भेटावे, एकमेकांशी हितगुज करावे, असे सर्वांना वाटते. पण संसाराचा गाडा हाकताना त्या आठणींवर धूळ जमा होते आणि सर्वजण आपापल्या आयुष्यात व्यस्त होऊन जातात. जुन्या मित्रांशी असलेला संपर्क तुटतो. मित्र मैत्रिणींना भेटावे तर वाटते पण बरीच वर्षे उलटून गेल्याने प्रत्येकजण आपआपल्या कामात व्यस्त असल्याने ते शक्य होत नाही.

पण ते अशक्य ही नसतं हे वाडेगाव मधील जागेश्र्वर विद्यालयातील १९७८ साली उत्तीर्ण होऊन गेलेल्या बॅच मधील विद्यार्थी मित्रमैत्रिणींनी सोशल मीडिया च्या माध्यमातून जग कसे जवळ आणता येते हे दाखवून दिले आहे. सोशल मीडिया मध्ये फेसबुक, व्हाट्सअप, इन्स्टाग्राम, टेलिग्राम, ट्विटर अशी खूप सारी माध्यमे आहेत. पैकी फेसबुक आणि व्हाट्सअप हे दोन सर्वात प्रभावशाली माध्यमे आहेत. या दोन गोष्टींमुळे संपुर्ण जग मोबाईल मध्ये सामावले आहे. स्मार्ट फोन आणि हायस्पीड इंटरनेटच्या दुनियेत जगामध्ये कोणत्याही कानाकोपय्रात असलेल्या व्यक्तीच्या संपर्कात आपण क्षणात येऊ शकतो. सुख- दुःखाचे क्षण फोटोत कैद करून इकडून तिकडे किंवा तिकडून इकडे पाठवू शकतो. एवढ्यावरच सोशल नेटवर्किंग न थांबता, आता चालू परिस्थितीत सोशल मिडीयाची व्यापकता अमर्यादित स्वरूपाची आहे. या सोशल मीडियामुळे संपूर्ण जग आपल्या हातात आलय. आपल्याला हव्या त्या पद्धतीने व्यक्त होण्याचं स्वातंत्र्य सोशल मीडियानं आपल्याला दिलं आहे. आपल्या मनातील चांगल्या  भावना सहज दुसऱ्यापर्यंत पोचवण्यासाठी आणि त्यात त्यांनाही सहभागी करून घेण्यासाठी हे सोशल मीडियाचं व्यासपीठ खूप चांगलं आहे यामुळे जगातील कानाकोपऱ्यांत अगदी कमी वेळेत संवाद साधण्याचे माध्यम विचारांची देवाणघेवाण करण्याचे, वेळ आणि पैशांची बचत करण्याचे माध्यम. 
एकाच वेळी अनेकांपर्यंत आपले म्हणणे, मत पोचविण्याचे प्रभावी माध्यम. 
जगाच्या कानाकोपऱ्यांतील कोणत्याही व्यक्तीशी तुमचा थेट संवाद होऊ शकतो. 
थेट संवादाचा फायदा वेगवेगळ्या क्षेत्रातील तुमचे ज्ञान वाढवण्यापासून व्यवसायवृद्धीपर्यंत कसाही होऊ शकतो.
सोशल मीडियावरील व्यक्तीशी संपर्क करण्यापूर्वी तुम्ही प्रोफाईल वाचू शकता. आवडीनिवडी जाणून घेऊ शकता. फोटोवरून त्यांच्या स्वभावाविषयी अंदाज बांधू शकता. या सर्व गोष्टींचा फायदा तुम्हाला त्या व्यक्तीशी थेट संवाद साधताना होतो. याचा वापर कुठे आणि कसा करायचा हे आपल्या हातात असते.

याच सोशल मीडियाचा वापर करून जागेश्र्वर विद्यालयाच्या १९७८ च्या बॅच मधील दोन मित्र विजय मानकर व विजय सरप रस्त्याने जात असताना तिसरा मित्र प्रदीप ढेंगे त्यांना भेटला आणि त्यांच्यामध्ये गप्पागोष्टी झाल्या व सोबत च व्हॉटसअप ग्रुप तयार करण्याबाबत चर्चा ही झाली. लगेचच जिवलग मित्र या नावाचा ग्रुप तयार झाल्यानंतर गजानन पुंडकर व इतर मित्रांच्या मदतीने बॅच मधील इतर सर्व मित्र व मैत्रिणींचे नंबर मिळवले. या ग्रुप मध्ये २२ मित्र व ३ मैत्रिणी एकूण २५ जण आहेत. यामध्ये कोणी प्रगतिशील शेतकरी, उत्कृष्ट शिक्षक, डॉक्टर, आस्थापने मध्ये उच्च पदावर, इंजिनियर तर काही तसेच एअर फोर्स, स्थल सेना, नौसेना, वायुसेने मधे उच्च पदावर, तांत्रिक शिक्षण संस्था संचालक, उच्च श्रेणी कंत्राटदार आहेत सर्वांना ही ग्रुप मधे सामील केले. नव्याने ग्रुप बनल्यावर ग्रुप वर हळू हळू सर्वांची पुन्हा एकदा ४२ वर्षाने नव्याने ओळख होऊ लागली होती. पुढे दिवसभरातील गप्पांसोबतच भेटण्याबाबत चर्चा झाली. चर्चेनंतर दिनांक २५ डिसेंबर २०१९ रोजी भेटण्याचे ठरले व श्रीहरी हॉटेल अकोट येथे विद्यार्थी मित्रमैत्रिणींच्या मेळावा आयोजित करण्यात आला. ज्या शाळेतील मित्र मैत्रिणींसोबत आपण लहानाचे मोठे झाले, त्याच सवंगड्यांसह एक डाव पुन्हा मांडण्याची संधी चालून आली ती म्हणजे यांच्या मेळाव्याच्या निमित्ताने. आपले दैनंदिन कामकाज सोडून तब्बल ४२ वर्षानंतर सर्व माजी विद्यार्थी मित्र मैत्रिणी सहपरिवार एकमेकांना भेटणार होते कारण अखंड विश्वाची अनुभूती म्हणजे मैत्री होय. ही अनुभूती सोशल मीडियावर व्यक्त होऊन ज्ञात नाही करता येत तर ती प्रत्यक्ष अनुभवावी लागते. मैत्रीचं स्वरुप खूप वेगळं असत ते मैत्रीचं अस्तित्व कळण्यासाठी ती जगावी लागते. आजचा देखावा असा आहे की सोशल मीडियावर अनेकजण मित्र होतात. पण हे सगळं ऑनलाइनपुरतंच मर्यादित आहे.

खऱ्या मैत्रीची अनुभूती आजच्या पिढीला झालेलीच नाही. कारण मैत्री ही न सांगता होते. इथे आनंद असो वा दुःख चेहऱ्यावरुन व्यक्त न होता, न सांगता डोळ्यातून कळतो. मैत्री कळण्यासाठी सोशल मीडियावर जवळ न येता, सहवासात जवळ आलं तर आयुष्याचं एक सोनेरी पान उघडल्यासारखा अनुभव येतो यासाठी एकमेकांना भेटण गरजेचं असत. यामुळेच हे लक्षात घेत जागेश्र्वर विद्यालयातील माजी विद्यार्थी मित्र मैत्रिणींनी गेट टू गेदर म्हणजेच मेळावा आयोजित केला होता. भेटायच्या दिवशी प्रत्येकाच्या मनाची झालेली अवस्था म्हणजे थोडे कुतुहल आणि थोडी हुरहुर होती मात्र जेंव्हा सर्व जण भेटले तेव्हा मनातील कुतुहल आणि हुरहुर कुठ्ल्या कुठे पळाली होती आणि उरली होती फ़क्त मित्रमैत्रिणींची सोबत!
दिनांक २५ डिसेंबर २०१९ रोजी ते प्रत्यक्षात श्रीहरी हॉटेल अकोट येथे सर्वजण एक एक करून आपल्या कुटुंबासोबत येत होते. तब्बल ४२ वर्षानंतर प्रत्यक्षात एकमेकांना पाहत होते. ४२ वर्षांनंतर ते सर्व चेहरे दिसले आणि आठवणी जाग्या झाल्या होत्या. एक गम्मत तर अशी झाली की ४२ वर्षात राहणीमानात व चेहऱ्यात संपूर्ण बदल झाल्याने एका मित्राला तर कोणी ओळखले सुध्दा नाही. नंतर ओळख दिल्यानंतर सर्वांनी त्यास ओळखले. सर्वजण एकमेकांना भेटल्याने गप्पांना उधाण आलं होतं. 


श्रीहरी हॉटेल ला मुक्कामी थांबून राहण्याची व्यवस्था नाजूकराव मानकर या मित्राने केली. त्यावेळी गप्पा, एकमेकांची थट्टा, जीवनातील काही प्रसंग कथन केले. सर्वांनी एकमेकांना आपल्या जीवनाविषयी, करत असलेल्या कामाविषयी माहिती दिली. आपले मित्र इतके उत्कृष्ट काम करत आहे हे पाहून  सगळ्यांचं उर अभिमानानं भरुन आलं होतं. सर्वांनी एकमेकांच्या सुख- दुःखात खंबीरपणे उभे राहण्याचा निर्णय घेतला होता. शालेय जीवनातील आपल्या प्रत्येक सहकार्याच्या सुख- दुःखात सहभागी व्हायचेच. शिवाय, संकटातून बाहेर काढण्यासाठी आर्थिक व मानसिक मदत करण्याचा निर्णय सुध्दा घेतला होता. या
गेट टू गेदरमुळे नेट चे जगत म्हणजे एक भौतीक जग यात जे काही होत ते टाईमपास किंवा काल्पनीक अस प्रत्येकला वाटायचं पण या दिवसांनी ते सगळ खोट ठरवलं. मैत्रीचं नातं सगळ्य़ा नात्यांपेक्षा कीती अनोख असते ते तेव्हा पुन्हा एकदा ४२ वर्षांनी दिसलं ते या गेट टू गेदरमुळे!

या दिवसांत सर्वांनी आपापले वय विसरुन भरपूर धमाल केली. फिरायला गेले, गप्पा, मनोरंजनाचे विविध कार्यक्रम केले. काहींनी शाळेतील, कॉलेज मधील अनुभव कथन केले. त्यावेळी एकदम शाळेचे दिवस समोर आले आणि आठवणींचा पट उलगडत गेला. विषय संपतासंपत नव्हते. कितीही गप्पा मारल्या तरी त्या कमीच वाटत होत्या. यावेळी  नुसत्या गप्पा आणि मनोरंजनच नव्हे तर काही महत्त्वपूर्ण विषयांवर देखील सर्वांनी चर्चा केली. पुढे एक मित्र आजारी असल्याने तो या मेळाव्यास येऊ न शकल्याने सर्वजण त्या मित्राच्या भेटीला पोहोचले व त्याची भेट घेतली. त्यानंतर २६ डिसेंबर २०१९ रोजी सकाळी गजानन महाराज पादुका संस्थान, भास्कर महाराज संस्थान अडगाव येथे दर्शन करून शांतीतिर्थ गजानन महाराज विहीर संस्थान येथे मित्रमैत्रिणींची पुढील सभा झाली. सभेनंतर श्रीधर धनोकार यांनी सहभोजनाची व्यवस्था केली. सहभोजनामध्ये वर्‍हाड स्पेशल रोडग्यांचे जेवण होते. पुढे सहभोजन ही आटपले आणि वेळ आली होती ती म्हणजे निरोप घेण्याची. या दिवसांच्या भेटीनं ताजेतवाने होऊन, निघताना परत भेटण्याचं स्वप्न डोळ्यात घेऊन सर्वांनी एकमेकांचा निरोप घेतला. जीवन म्हणजे जणू आठवणींचे गाठोडेच. अनुभवांचे पुंजके जमा करत आपण जगत असतो. त्यात विविध अनुभव येतात. कधी हर्षाचे तरंग उठतात तर कधी दुःखावेगाने जीव त्रासून जातो. नजर लागावी इतका आनंद तर जगणे मुश्किल व्हावे इतके दुःख, या सुखदुःखाच्या झोपाळ्यावर जणू मानवी आयुष्य झुलत असते. त्यामुळे आयुष्यातले सगळे क्षण आठवणीत राहतात असं नाही. पण काही क्षण असे असतात जे विसरु म्हणताही विसरता येत नाहीत ते म्हणजे या सर्व मित्र मैत्रिणींना जगलेले हे सोबत चे दिवस. यांची मैत्री ही त्या अंनत क्षणातला असाच एक क्षणच. या दिवसांनी प्रत्येकाच्या मनाला जसं एक वेगळ समाधान दिलं. ही भेट आजपर्यन्त न अनुभवलेला एक असा अनुभव देऊन गेली. अजूनही प्रत्येकाच्या मनाला असेच वाटत असेल की ती भेट म्हणजे फ़ारच छोटी होती.

सोशल मीडियामुळे जग जवळ आलय हे मात्र खरं पण आपण ही यांच्या प्रमाणे
कधीतरी ऑफलाईन राहून आपल्या प्रिय माणसांना मनापासून भेटुया, एकमेकांचे हितगुज समोर बसून शेअर करूया,सदिच्छा व्यक्त करूया आणि प्रत्येक क्षणाच्या गोड आठवणी मनात जपुन ठेवूया. ऑनलाईन जग खरा आनंद देऊन जात की ऑफलाईन जग सुखद क्षण देऊन जात हे ही बघुया!

Related posts

7 people To Follow If You Want A Career in UX Design

admin

माधुरी दीक्षित- नेने झळकणार वेब सिरीज मधे!

nirbhid swarajya

खामगांव येथे ऑल बॉडी फिटनेसचा उद्या शुभारंभ

nirbhid swarajya
error: Content is protected !!