ट्रेंडिंग कंमेंट्स करणाऱ्यांनो थोडा तरी विवेकबुद्धीने विचार करा!
नेटकरी ट्रोलर मंडळी कधी आणि कस कुणाला ट्रोल करतील सध्या सांगता च येत नाही. काही दिवसांआधी लोकप्रिय वृत्तनिवेदिका ज्ञानदा कदम यांच्या नावाने गेले काही दिवस सोशल मीडियावर ट्रेंड सुरू होता. ‘काय सांगशील ज्ञानदा’ असा हॅशटॅग वापरून लोक विविध प्रश्न विचारत होते. हलक्या फुलक्या प्रश्नांपासून लोक मनाला वाटेल ते प्रश्न विचारत होते व सोबत मीम्स ही शेअर करत होते. एक वृत्तनिवेदिका म्हणून ज्ञानदा कदम चा हा सगळा प्रवास आहे. त्यासाठी तिने कितीतरी मेहनत घेतली असेल. मुळात त्यांना नेमकं का ट्रोल केलं जातंय? त्यांचं काय चुकल आहे?आणि शेवटी चुका ह्या प्रत्येकाकडून होत असतात.
या गोष्टींमुळे मनोरंजन नक्की होईल पण स्त्रियांवर अश्या प्रकारे मानसिक प्रहार करणे कितपत योग्य आहे? हा ट्रेण्ड संपत च नाही तो नवीन ट्रेण्ड सुरू झालाय तो म्हणजे फेसबुकवर आपल्या मित्रांच्या जुन्या पोस्ट केलेल्या फोटोंवर मुलींबद्दल वाईट अश्या कॉमेंट्स टाकल्या जात आहेत.
त्या कॉमेंट्स खालील स्वरूपात
भाऊँ आमचा आहें मोठा व्यापारी
पोरिना म्हणतो आता पप्पा आहें तू ये दुपारि..
भाऊ आमचा खुंखार वाघ।।। वाघाने धरला ससा।।।।भाऊ बोलत नाही म्हणून पोरींनि कापल्या नसा।।।
झालं आता वरण द्या त्याला तडका..
भाऊ चा फोटो पाहून मुली म्हणतात
मेरा अंग अंग फडका
सरकार ने माफ केले शेतकऱ्यांचे लोन
भाऊंना बघून केला ज्ञानदा ने फोन
महिलांनी, मुलींनी आपली मतं, विचार सोशल मीडियावर मांडले की लगेच त्या महिलेच्या चारित्र्यावर, बुद्धीवर टिप्पणी करत त्यांना ट्रोल करण्याचा जणू ट्रेंड बनलाय. ती महिला कुठल्याही क्षेत्रातील असो वा कुठल्याही पदावर असो महिलांना ट्रोल करून त्यांची मुस्कटदाबी करण्याचा प्रयत्न सोशल मीडियावर सर्रास चालतो. त्यामुळे सध्याच्या काळात महिलांसाठी सर्वात असुरक्षित बनत जाणारी जागा म्हणजे डिजिटल मीडिया आहे. सोशल मीडियावर महिलांना ट्रोल करण्याची प्रवृत्ती सध्या वाढत आहे आणि हे चित्र जगभर पाहायला मिळते. आपले विचार खुलेपणाने मांडणाऱ्या महिलांना या ट्रोल्सचा सामना करावा लागतो. भारतासह महाराष्ट्रामधे ही परिस्थिती काही वेगळी नाही. महाराष्ट्रामधे अनेक महत्त्वाच्या पदांवर मोठ्या जबाबदाऱ्या सांभाळणाऱ्या महिलांनाही या ट्रोल्सचा सामना करावा लागतो. लोकांना आपले विचार मांडण्यासाठी सोशल मीडिया प्रभावी माध्यम ठरत असताना झुंडीने कमेंटबॉक्समध्ये शिरणाऱ्या या ट्रोल्सचं प्रमाणही वाढत आहे. सोशल मीडियावर सक्रिय असणाऱ्या, राजकारणापासून, समाजातील विविध प्रश्नांबाबत भूमिका घेणाऱ्या, त्याविषयी निर्भीडपणे मतं मांडणाऱ्या महिलांचा आवाज दाबण्याचा विविध मार्गांनी प्रयत्न केला जातो. तिला अर्वाच्य भाषेत बोलणे, धमक्या देणे, तिच्या लिखाणाची, विचारांची निंदानालस्ती करणे, तिच्या खासगी आयुष्यातील तपशील खोडसाळपणे प्रसिद्ध करून तिची बदनामी करणे या सगळ्या पातळ्या ट्रोल्स गाठतात. मुक्तपणे विचार करणाऱ्या महिलांसाठी भीतीचे वातावरण निर्माण करण्याचा हा प्रयत्न आहे असे दिसुन आले आहे.
महाराष्ट्रातील मुली, स्त्रिया ह्या कला, क्रीडा, सामाजिक, राजकीय प्रत्येक क्षेत्रात आपल्या कतृत्वाने पुढे आहेत. रिक्षा-टॅक्सी चालवण्यापासून कॉर्पोरेट कंपनीमधील बॉसची भूमिका बजावत संपूर्ण कारभाराचा डोलारा सांभाळणारी ती आजच्या काळात सक्षम झाली आहे. घराची सगळी व्यव्यस्था बघून बाहेरची कामही सांभाळणाऱ्या स्त्रियांच्या कार्यक्षमतेवर समाजात या असल्या ट्रेण्ड मुळे बरेच गैरसमज पसरवले जातात. आपल्या महाराष्ट्राला जिजामाता, सावित्री बाई फुले यांच्यासारख्या थोर महिलांचा वारसा लाभलेला आहे. तरीही आपला समाज शिकला पण समाज सुशिक्षित झाला नाही हे या ट्रेंड्स वरून लक्षात येते. सध्या लॉकडाउन मुळे घरात राहून कंटाळा येणे साहजिकच आहे पण अश्या वेळी कुटुंबाला वेळ देत अनेक माध्यमानमधून अनेक लोकांशी संवाद साधला जाऊ शकतो .‘मुक्त’ विचारांना समाजात कायमच पाठिंबा देण्यात आला आहे. प्रत्येक व्यक्ती त्यांच्या पोस्ट मधून काहीना ना काही मांडू पाहात असेल, तर त्यांला विरोध अजिबात नाही पण शब्दांच्या मर्यादेचा विचार स्वतः करणे गरजेचे आहे.
मुलगी ही घराची शान आणि घराण्याची इज्जत असते असं कितीतरी वेळा ऐकायला मिळतं. मात्र त्याच घरच्या इज्जतीला घरच्यांकडून तसंच समजाकडून किती सन्मान मिळतो हा ही प्रश्न आहेच.
मुलींच्या वावरण्यावर बंधन घालण्यात काहीही उपयोग नसून समाजातील प्रत्येक घटकाने आपल्या विचारसरणीत बदल घडवण्याची गरज आहे. एकविसाव्या शतकातील बदल तसंच स्त्रीला फक्त एक स्त्री न समजता एक व्यक्ती म्हणून समजण्यास उपयुक्त असलेला बदल हे खरंच गरजेचं आहे व अशा चुकीच्या गोष्टींचं समर्थन करण्यापेक्षा आपणच पुढाकार घेऊन यावर काहीतरी तोडगा काढला पाहिजे. कायद्याच्या भाषेत सांगायचे झाले तर एखाद्या मुली किंवा स्त्री विषयी अपशब्द बोलणे, तिच्याविषयी सोशल मीडियावर वाईट लिखाण केल्यास यावर कलम ३५४ नुसार गुन्हा दाखल होऊ शकतो याचीही स्वतः ला सज्ञान म्हणवून घेणाऱ्यांनी नोंद घ्यावी. आमचा विरोध जुन्या फोटोवर टिप्पण्या करण्यात नसून त्यावर करत असलेल्या मुलींविषयीच्या वाह्यात कॉमेंट्सला आहे. मुली आणि स्त्रियांविषयीचे वाईट विचार ह्या कॉमेंट्स द्वारे टाकणे बंद करा कारण ज्यावेळी प्रत्येक जण स्वतःच्या मनातले हे मागासलेले, बुरसटलेले विचार बाजूला सारून एका नवीन उमेदीने आणि कृतीने स्त्रीयांसाठी पाऊले उचलली तर नक्कीच स्त्रिया आणि मुलींवर असलेले हे आहे वाईट ट्रेण्ड आपोआप बंद होतील तूर्त एवढेच!