लोणार : बुलडाणा जिल्ह्याच्या लोणार सरोवरातील पाण्याचे गुणधर्म कायम रहावे तथा त्यात मानवी हस्तक्षेपामुळे होणारे प्रदुषण टाळण्याच्या दृष्टीकोणातून शहरातील सांडपाणी सरोवरात जाण्यापासून रोखण्यासाठी निरीच्या माध्यमातून उभारण्यात आलेला सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प दोषपूर्ण आहे. सोबतच याबाबत न्यायालयात चुकीची माहिती देण्यात आली असल्याची माहिती प्रतिवादी पक्षाचे अॅड. आनंद परचुरे यांनी दिली आहे. लोणार सरोवर संवर्धनसाठी नागपूर खंडपीठात एक याचिका दाखल करण्यात आली आहे, या याचिकेत प्रतिवादी पक्षाचे वकील म्हणून अॅड. आनंद परचुरे काम करत आहे. १५ जून रोजी नागपूर खंडपीठात लोणार सरोवराचे पाणी लालसर गुलाबी झाल्याच्या पार्श्वभूमीवर त्याच्या कारणांचा शोध घेण्यासोबतच पुर्वी दिलेल्या खंडपीठाच्या आदेशानुसार प्रशासकीय पातळीवर कोणत्या बाबींची पुर्तता झाली, याची पाहणी करण्यासाठी न्यायालयाच्याच सुचनेनुसार गठीत समिती लोणार सरोवर येथे पाहणी करण्यासाठी आली होती त्यावेळी प्रतिवादी पक्षाचे वकील अॅड. आनंद परचुरे यांनी या नीरीच्या प्रकल्पात दोष असल्याचे म्हटले होते. लोणार सरोवर संवर्धनाचा मुद्दा न्यायालयाने गंभीरतेने घेतला असून जागतिक महत्त्व लोणार सरोवराला आहे. प्रामुख्याने येथील सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पाचा मुद्दा गंभीर असून अद्यापही सरोवरात सांडपाण्याचा निचरा होत असावा असे निरीक्षण आहे.