खामगाव : ‘लॉकडाऊन’ कालावधीत नगरपालिकेची परवानगी न घेता अवैध बांधकाम केल्याप्रकरणी नगरपालिकेच्या तक्रारीवरून दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नगरपालिकेच्या परवानगीविना अवैधरीत्या कॉम्प्लेक्सचे बांधकाम केल्याप्रकरणी नंदु दुबे व एक डॉक्टर या दोघांविरुद्ध १६ जून रोजी शहर पोस्टेमध्ये गुन्हे दाखल करण्यात आले. याबाबत स्थानिक नगरपालिकेचे नगर रचनाकार अनुराग विनय घिवे (सहायक न.प.खामगाव) यांनी शहरपोलीस ठाण्यात तक्रार दिली की,जलंब नाक्यावर हॉस्पिटल असलेल्या एका डॉक्टर ने कॉम्प्लेक्सचे बांधकाम केले आहे. सिट नं.२२ वी नझुल प्लॉट १/२मध्ये ३९३ चौ.मी. पालिकेच्या परवानगीविना बांधकाम केले. बांधकाम सुरु असतांना नगरपालिकेने डॉक्टर ला बांधकाम थांबविण्याची नोटीसही दिली होती त्यामुळे या डॉक्टर वर एमआरपीपी अॅक्टच्या कलम ५२ नुसार गुन्हा दाखल केला आहे.तसेच नंदकिशोर शिवलाल दुबे यांनीसुद्धा डीपी रोडवर प्लॉट नं.१ सर्वे नंबर ९६/२ वर २११३.०३ चौ.मि. बांधकाम केले. त्यांनाही बांधकाम थांबविण्याची सूचना नगरपालिकेने दिली होती. तरीही त्यांनी बांधकाम थांबविले नाही. त्यामुळे नंदकिशोर दुबेविरुद्ध संदर्भीय कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला. नगरपालिकेने केलेल्या या कारवाईमुळे खामगाव शहरातील बांधकाम व्यावसायिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, अवैध बांधकाम करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहे. खामगांव शहरात अनेक अवैधरीत्या बांधकाम सुरु आहेत या कडे सुद्धा नगर पालिकेने लक्ष देणे गरजेचे आहे.