November 20, 2025
खामगाव जिल्हा बुलडाणा

पहिला ‘मूकनायक’ पुरस्कार पत्रकार राहुल पहुरकर यांना मान्यवरांच्या हस्ते प्रदान

पत्रकारांनी सातत्याने समाजातील वंचित, शोषित, पिडीतांचे आधार व्हावे – ज्येष्ठ पत्रकार राहुल पहुरकर

खामगांव : अंबाजोगाई तालुका पत्रकार संघाने यंदापासुन ‘मूकनायक’ दिनी राज्यातील चळवळीशी आणि तळागळाशी संबंधीत पत्रकारास ‘मूकनायक’ पुरस्कार देण्याचे जाहिर केले. त्यानुसार पहिलावहिला राज्यस्तरीय ‘मूकनायक’ पुरस्कार हा ज्येष्ठ पत्रकार राहुल पहुरकर यांना काँग्रेसचे राजकीशोर मोदी, उपनगराध्यक्ष बबन लोमटे, अ‍ॅड. माधव जाधव, जयजित शिंदे, वैभव विकास वाघमारे, महादेव गोरे यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रदान करण्यात आला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी स्वातंत्र्यपूर्व काळात आपल्या लेखणीच्या माध्यमातून समाजातील जे मागास घटक आहेत. शिवाय वंचित, दुर्लक्षीत, शोषित आणि पिडीत घटक आहेत. त्यांना न्याय, हक्क, संरक्षण मिळाले पाहिजे, यासाठी ‘मूकनायक’ हे पाक्षीक समर्पित केले. आज पत्रकारीतेची अवस्था ही खुप वेगळी बनली आहे. त्यामुळे जे व्रत आपण घेतले आहे. त्याला अनुसरून आपले कामकाज असणे अपेक्षीत आहे. देशातील माध्यमांची अवस्था आज खुप वाईट झाली आहे, तरी देखील ग्रामिण आणि स्थानिक पातळीवर वृत्तपत्र व समाज माध्यमे चांगले काम करीत आहे. त्यामुळे मला त्या पत्रकारांकडून अपेक्षा आहे की, तरूण पत्रकारांनी वंचितांचे, दुर्लक्षीतांचे व शोषितांचे आधार होवून आपले सामाजिक दायित्व निभवावे, असे परखड मत मुंबई येथील ज्येष्ठ पत्रकार तथा विविध माध्यम क्षेत्रात काम केलेले राहुल पहुरकर यांनी अंबाजोगाई येथे अंबाजोगाई तालुका पत्रकार संघाच्या वतीने आयोजित ‘मूकनायक’ दिन व विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या सत्कार सोहळा कार्यक्रमात बोलताना व्यक्त केले. अंबाजोगाई तालुका पत्रकार संघाच्या वतीने स्व.विलासराव देशमुख सभागृह, नगर परिषद येथे ‘मूकनायक’ दिन आणि सत्कार सोहळा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बीड जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राजकीशोर मोदी हे होते तर प्रमुख अतिथी म्हणून उपनगराध्यक्ष बबन लोमटे, सामाजिक कार्यकर्ते तथा किसान काँग्रेसचे मराठवाडा अध्यक्ष अ‍ॅड. माधव जाधव, संत ज्ञानेश्वर शिक्षण संस्था, आपेगावचे सचिव जयजित शिंदे, युपीएससी मधून ग्रुप A पदासाठी निवड झालेले वैभव विकास वाघमारे आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी बोलताना ज्येष्ठ पत्रकार राहुल पहुरकर म्हणाले की, गेल्या 22 वर्षापासुन मी पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहे. विविध माध्यमांमध्ये, वृत्तवाहिन्यांमध्ये काम केले असून या ठिकाणचा वेगवेगळा अनुभव माझ्या पाठीशी आहे. आज पत्रकार आणि वृत्तपत्र यांच्याविषयीची विश्वासार्हयता दिवसेंदिवस ढासळत चालली आहे. याचे आत्मचिंतन करण्याची गरज आहे. आजचा ‘मूकनायक’ दिवस साजरा करत असताना आपण सर्वांनी संकल्प केला पाहिजे की, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी स्वातंत्र्यपूर्व काळात ज्यावेळी आजचे प्रगत तंत्रज्ञान नसतानाही आपल्या विद्वत्तेचा वापर हा लोकांसाठी केला. बाबासाहेबांनी वेगवेगळे वृत्तपत्र प्रकाशित करून त्यातून समाज घटकांना न्याय देण्याचा प्रयत्न केला. स्वातंत्र्याच्या पूर्वी माणसाला माणूस म्हणून वागणूक मिळत नव्हती. अशा काळात बाबासाहेबांचा लढा हा व्यवस्थेच्या विरूद्ध राहिला. व्यवस्थेच्या विरूद्ध प्रहार करून व्यवस्थेला वठणीवर आणण्याचे काम त्यांनी केले. आज माध्यम जगताची दशा आणि दिशा पाहिली तर एकीकडे निराशा आणि एकीकडे आशेचा नवा किरण दिसत आहे. आजची माध्यम ही प्रस्थापितांच्या अर्थात उद्योजकांच्या ताब्यात गेली आहेत. त्यामुळे आता पत्रकारांना किती प्रतिष्ठा व किती सन्मान मिळतो याचा शोध घ्यावा लागतो. परंतु, अशा ही काळात काही पत्रकार आपला स्वाभिमानी बाणा टिकवून आहेत. आपल्या विचारांशी तडजोड न करता माध्यम जगतात प्रभावीपणे काम करीत आहेत. पुढे बोलताना ते म्हणाले की,बाबासाहेबांचे संपुर्ण आयुष्य हे समाजातील लहान-लहान घटकांसाठी समर्पित केलेले आहे. ‘मूकनायक’ अर्थात ज्यांना वाणी नाही, ज्यांना वाली नाही, ज्यांना व्यवस्थेच्या विरोधात लढता येत नाही, अशांचे पाठीराखे होवून त्यांचा आधार बनले पाहिजे. आजच्या काळात सुद्धा बाबासाहेबांच्या विचारांवर चालण्याची गरज निर्माण झाली आहे. त्यामुळे आपण सर्वांनी जे व्रत हाती घेतले आहे, त्या व्रताचा अवलंब करून समाजातील जे उपेक्षित, शोषित, वंचित, पिडीत घटक आहेत. यांच्यासाठी आधार बनावे, अशी अपेक्षा व्यक्त करून आजच्या माध्यम युगाचे विश्लेषण त्यांनी वेगवेगळ्या पद्धतीने केले. हे विश्लेषण करताना सकारात्मक आणि नकारात्मक या दोन्ही पटलावर मांडण्याचा त्यांनी प्रयत्न केला. पत्रकार राहुल पहुरकर यांच्या अभ्यासु मनोगताचे अनेकांनी कौतुक केले. अध्यक्षीय समारोप करताना काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजकिशोर मोदी म्हणाले की, अंबाजोगाई शहरातील जनतेने माझ्यासारख्या सामान्य कुटुंबाला गेली तीस वर्ष नगर परिषदेच्या माध्यमातून काम करण्याची संधी दिली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळे मला या ठिकाणी आरक्षीत घटकातून काम करता आले. अंबाजोगाई शहराच्या विकासासाठी प्रयत्न केले. आगामी काळात सुद्धा या शहराचा ‘व्हिजन प्लॅन’ तयार आहे. अंबाजोगाई तालुका पत्रकार संघाच्या सर्व सदस्यांनी बाबासाहेबांच्या स्मृतीप्रित्यर्थ हा ‘मूकनायक’ दिन साजरा करून महामानवाच्या विचारांचा जागर घडवून आणला असल्याची भावना व्यक्त केली. या प्रसंगी उपनगराध्यक्ष बबन भैय्या लोमटे, अ‍ॅड. माधव जाधव, जयजित शिंदे यांनी आपल्या भावना व्यक्त करत पत्रकार संघाच्या उपक्रमाला शुभेच्छा दिल्या तर वैभव विकास वाघमारे आणि कु. ऐश्वर्या टाक यांनी सत्काराला उत्तर दिले.सर्वप्रथम डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस मान्यवरांनी अभिवादन करून कार्यक्रमाची सुरूवात झाली. प्रास्ताविक अंबाजोगाई तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष महादेव गोरे यांनी केले तर सुत्रसंचालन परमेश्वर गित्ते यांनी तर आभार प्रदर्शन प्रा. प्रदिप तरकसे यांनी केले. या कार्यक्रमास अंबाजोगाई शहरातील खोलेश्वर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कमलाकर कांबळे, प्रा. डॉ. गौतम गायकवाड, प्रा. डॉ. मुकुंद राजपंखे, एस. बी. सय्यद, नंदाताई टाक, संजय साळवे, प्रा. राजकुमार ठोके, प्रा. नागेश जोंधळे, प्रा. राहुल सुरवसे, घाटनांदुर येथील साहित्यीक नागनाथ बडे, आकाश वेडे यांच्यासह तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष दत्तात्रय दमकोंडवार, सचिव रणजित डांगे, ज्येष्ठ पत्रकार सुदर्शन रापतवार यांच्यासह अभिजित गुप्ता, नागेश औताडे, सतिश मोरे, राहुल देशपांडे यांच्यासह आदी मान्यवर उपस्थित होते. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पत्रकार संघाचे पदाधिकारी जगन सरवदे, दादासाहेब कसबे, सचिव गणेश जाधव, रोहिदास हातागळे, धनंजय जाधव, प्रविण कुरकुट, रत्नदिप सरवदे, रविंद्र आरसुडे, काकासाहेब वाघमारे यांच्यासह इतर पदाधिकार्‍यांनी प्रयत्न केले. अंबाजोगाई तालुका पत्रकार संघाने विविध क्षेत्रात उल्लेखनिय काम करणार्‍या व्यक्तींचा सन्मान करून त्यांच्या कार्याचा गौरव केला.

Related posts

एसटीला आर्थिकदृष्ट्या मजबूत करण्यासाठी इंटकचे एसटी बचाव आंदोलन

nirbhid swarajya

घाटपुरी जवळ ट्रॅव्हल्स पलटी; दोन जण जखमी

nirbhid swarajya

मराठा पाटील समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा…

nirbhid swarajya
error: Content is protected !!