November 20, 2025
आरोग्य जिल्हा

पाच वर्षाच्या ‘गुडीया’ ने दिली.. कोरोनाला मात..!

कोविड केअर सेंटरमधून मिळाली सुट्टी

बुलडाणा : भल्याभल्यांना घाम फोडणाऱ्या कोरोनाने लहानग्यांनाही सोडले नाही. एक वर्षाच्या बाळापासून ते म्हाताऱ्यापर्यंत सर्वांचाच कोरोनाचा पिच्छा पुरविला आहे. मोठ्या शहरांमध्ये, तर कोरोनाचे साम्राज्य आहे. अशा परिस्थितीत मलकापूर तालुक्यातील नरवेल येथील पाच वर्षाच्या ‘गुडीया’ ने कोरोनाशी चिवट झुंज दिली. मुंबई येथून गावाकडे आल्यानंतर कोरोना पॉझीटीव्ह आढळलेली ही मुलगी बुलडाणा येथे कोविड केअर सेंटरला दाखल होती. या गुडीयाने कोरोनावर मात करीत आज सर्वांना सुखद धक्का दिला. ही गुडीया आनंदाच्या भावमुद्रेत सेंटरच्या बाहेर पडली व टाळ्या वाजवून उपस्थितांनी तिचे स्वागत केले.  गुडीयाच्या सुट्टीमुळे सध्या तरी मलकापूर तालुक्यातून कोरोनाला हद्दपार करण्यात यश आले आहे.

आजपर्यंत जिल्ह्यात एकूण 37 कोरोनाबाधीत रूग्ण आहेत. त्यापैकी 26 कोरोनाबाधीत रूग्ण बरे होवून आपल्या स्वगृही परतले आहे. एकूण रूग्णांपैकी 3 मृत आहेत. नरवलेच्या गुडीयाला केंद्र शासनाच्या नवीन निकषांनुसार कुठलेही कोरोनाचे लक्षणे आढळून न आल्यामुळे सुट्टी देण्यात आली. यानंतर घरी तिला विलगीकरणात ठेवण्यात येणार आहे. रुग्णालयातून सुटी देण्यात आलेल्या रुग्णांमध्ये मलकापूर तालुक्यातील येथील पाच, खामगाव तालुक्यातील दोन, शेगाव येथील तीन, सिंदखेड राजा तालुक्यातील 2, देऊळगाव राजा येथील दोन, चिखली येथील तीन, बुलडाणा येथील 8 व जळगाव जामोद येथील एक अशाप्रकारे 26 रुग्णांचा समावेश आहे. सध्या रुग्णालयात आठ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
   नरवलेच्या या चिमुकलीला जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.  प्रेमचंद पंडित यांच्या हस्ते डिस्चार्ज पेपर देण्यात आला. त्यांनी पुष्पगुच्छ देवून चिमुकलीचे स्वागत केले.  यावेळी उपस्थित डॉक्टर्स, नर्सेस व ब्रदर्स यांनी गुडीयाचे टाळ्या वाजवून स्वागत केले. तसेच गुडीलया मोठ्या आनंदाने निरोप दिला. शासनाच्या रुग्णवाहिकेतून तिला घरी सोडण्यात आले. यावेळी गुडीयाच्या पालकांनी आरोग्य यंत्रणेने घेतलेल्या काळजीबद्दल आभार व्यक्त केले. तसेच सर्वांना धन्यवादही दिले. 

Related posts

सरपंच उन्हाळे यांच्या वाढदिवसानिमीत्त भव्य आरोग्य व शस्त्रक्रिया शिबीराचे आयोजन

nirbhid swarajya

शनिवारी व रविवार सर्व किराणा दुकाने पूर्ण पणे बंद

nirbhid swarajya

लॉकडाऊन मध्ये नियम न पाळणार्‍यावर पोलीस प्रशासनाची कारवाई

nirbhid swarajya
error: Content is protected !!