बुलडाणा : लॉकडाऊन मध्ये दररोज शहरातील बाजारात भाजीपाला घेण्यासाठी नागरिक मोठ्या प्रमाणात गर्दी करीत आहेत. त्यामुळे आता दररोज भाजीपाला मिळणार नसून आठवडयातून दोन दिवसच तेही सोशल डिस्टनसिंग चे पालन करूनच मिळणार आहे.
गुरुवार व रविवार या दोन दिवसांत नागरिकांनी शहरातील ठरवून दिलेल्या ठिकाणी नियमांचे पालन करुन जीवनावश्यक वस्तु घेण्याचे नगरपालिकेने ठरविले असून तश्या सूचना देण्यात आल्या आहेत. तर ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना फक्त दोन दिवस शहरात भाजीपाला विक्रीकरिता आणायचा आहे त्या व्यतिरिक्त जर शहरात विनाकारण फिरतांना दिसल्यास त्यांच्यावर कड़क कारवाई केली जाईल असे आदेश नगरपालिकेने दिले आहेत.
बुलडाणा जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या वाढत असल्याने हे कड़क निर्बंध केले आहेत व याचे नागरिकांनी पालन करावे असे आवाहन आमदार संजय गायकवाड यांनी बैठकीतुन केले आहे. तसे निर्देश सुध्दा नगर परिषदेच्या अधिकारी व कर्मचार्यांना देण्यात आले आहे.