खामगावात गुरू तेग बहादूर यांच्या ४०० व्या प्रकाशपर्वानिमित्त प्रबोधनमहोत्सव
खामगाव: संस्कृती आणि धर्म रक्षणासाठी बलिदानाची परंपरा गुरू तेग बहादूर यांनी स्वत:पासून सुरूवात केली आणि म्हणूनच कृतीशील बलिदानाचे शिरोमणी म्हणून गुरू तेग बहादूर यांचे स्थान सर्वोच्च आहे. देश, धर्म आणि संस्कृती या त्रिसुत्रींच्या रक्षणासाठी गुरू तेग बहादूर यांनी दिलेल्या बलिदानाचे स्मरण हे प्रत्येकाचं दायित्व आहे, असे प्रतिपादन विश्व हिंदू परिषदेचे विदर्भ प्रांत मंत्री गोविंद शेंडे यांनी येथे केले.गुरू तेग बहादूर यांच्या ४०० व्या प्रकाशपर्वानिमित्त खामगाव येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर मैदानावर आयोजित ‘गुरू तेग बहादूर; हिंद की चादर’ या प्रबोधनात्मक कार्यक्रमात ते प्रमुख व्याख्याते म्हणून बोलत होते. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून श्री गुरूद्वारा सिंघ सभेचे गं्रथी जिल्हा संघचालक बाळासाहेब काळे, महादेवराव भोजने, तालुका संघचालक संतोष देशमुख, नगर संघचालक नंदलाल भट्टड, श्री गुरूद्वारा सिंघ सभेचे चरणजीतसिंह जुनेजा, हिरानंद नथ्थाणी, अजय चव्हाण यांची व्यासपीठावर उपस्थिती होती. संस्कारी माणसंच इतिहास घडवतात. गुरू तेग बहादूर यांच्यावर त्यांचे आजोबा अर्जूनदेव यांनी देश रक्षणाचे संस्कार केले. आजोबा आणि मुलापासून प्रेरणा घेत तेग बहादूरजी यांनी उपदेश न देता, कृतीशीलतेतून तलवारीच्या जोरावर सुरू असलेल्या तत्कालीन धर्मांतरणाच्या चक्राला खंडीत करण्याचे धाडस गुरू तेग बहादूर यांनी केल आणि आपल्या कृतीशील बलिदानातून बलिदानाचे उदाहरण समोर केले. असे शेंडे यांनी शेवटी स्पष्ट केले.प्रास्ताविक महादेवराव भोजने यांनी केले. संचालन संजय बोरे यांनी तर आभार प्रसाद गाजुल यांनी मानले. उपस्थित मान्यवरांचे स्वागत अमरजीतसिंह बग्गा, जसवंतसिंह शीख, नानकसिंह जाट, कुलदीपसिंह संधू, चरणजीतसिंह मेहरा, मनजीतसिंह सलुजा, आनंदसिंह चव्हाण, ईश्वरसिंह चव्हाण, मोनू सलुजा, कुलदीप पोफली, रजपाल चव्हाण आदींनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्री गुरू तेग बहादूर प्रकाशपर्व समिती आणि श्री गुरूद्वारा सिंघ सभा खामगावच्यावतीने परिश्रम घेण्यात आले. कार्यक्रमाच्या शेवटी अंजली पुरोहित हीने वंदेमातरम गीत सादर केले. त्यानंतर कार्यक्रमाची सांगता झाली.
गुरू तेग बहादूर यांची संगत –कार्यक्रमाला सुरूवात करण्यापूर्वी गुरू तेग बहादूर यांची संगत श्री गुरूद्वारा सिंघ सभेच्यावतीने कार्यक्रमस्थळी आणण्यात आली. यामध्ये शीख समुदायातील मातृशक्तीने उत्स्फूर्त सहभाग दिला. भारतमातेच्या पूजनानंतर प्रकाशपर्व प्रबोधन महोत्सव पार पडला. यावेळी आ. आकाश फुंडकर यांचाही श्री गुरूद्वारा सिंघ सभेच्यावतीने सत्कार करण्यात आला.