बुलडाणा : महाराष्ट्रातील कोरोनामुळे अनाथ झालेल्या सातशे विद्यार्थ्यांचे पालकत्व भारतीय जैन संघटना स्वीकारणार आहे. यासंदर्भात भारतीय जैन संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन तशी माहिती दिली आहे. पाचवी ते बारावी पर्यंत शिकणाऱ्या मुला-मुलींना या सुविधेचा लाभ मिळणार आहे. ज्या विद्यार्थ्यांनी आपल्या पालकांना कोविडमध्ये गमावलेले आहे.

अशा विद्यार्थ्यांना या संधीचा लाभ मिळणार आहे. त्यांच्या दैनंदिन शिक्षणासोबतच मानसिक तणावातून बाहेर काढून मुख्य प्रवाहात आणणे व त्यांचा आत्मविश्वास वाढविणे हे भारतीय जैन संघटनेचे उद्दिष्ट आहे. पुणे येथील हॉस्टेलमध्ये वसतिगृह, खेळाचे मैदान, दवाखाना, मानसोपचार तज्ञ, अशा सुविधा उपलब्ध आहेत. या पूर्वी येथे लातूर येथील बाराशे भूकंपग्रस्त विद्यार्थी या ठाण्यातील अकराशे आदिवासी विद्यार्थी व आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांची ७०० विद्यार्थी अशा एकूण तीन हजार विद्यार्थ्यांना मानसिक तणावातून बाहेर काढून त्यांचे पुनर्वसन करण्याचे काम गेल्या तीस वर्षांपासून जैन संघटना करीत आहे.

बुलडाणा जिल्ह्यातील सर्व अनाथ झालेल्या विद्यार्थ्यांचे पालकत्व स्वीकारण्यास संदर्भातील पत्र नुकतेच संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी एस राममूर्ति यांना दिले आहे. यावेळी संघटनेचे राजेश देशलहरा, संदीप नाहर, सतीश बेलकर, कीर्तिकुमार बायकोस व रुपेश मारव आदी उपस्थित होते.
