January 4, 2025
आरोग्य खामगाव जिल्हा बुलडाणा महाराष्ट्र मुंबई राजकीय शिक्षण सामाजिक

भेंडवळ घटमांडणी ला कोणताही शास्त्रीय आधार नाही- रघुनाथ कौलकार

खामगांव : कोणत्याही प्रकारचा वैज्ञानिक आधार नसलेल्या व संभाव्यतेच्या नियमाद्वारे(law of probability) कोणीही कोणतेही भाकिते वर्तवली तरी अंदाजे 50 ते 60 % खरे ठरू शकणाऱ्या भेंडवळ घटमांडणी च्या भाकीतांवर जनतेने विश्वास ठेवू नये असे आवाहन अ. भा. अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे जिल्हा संघटक रघुनाथ कौलकार यांनी केले आहे. संगणकीय युगात सुद्धा भेंडवळ येथे घटमांडणीतील घटात रात्रभर ठेवलेल्या पदार्थाच्या हालचालींचे निरीक्षण करून झालेल्या बदलावरून देशाची राजकीय, आर्थिक, भौगोलिक व संरक्षण विषयक परिस्थिती तसेच पीक पाणी व पर्जन्यमानाची भविष्यवाणी केली जाते. घटामध्ये रात्रभर अठरा धान्य व पुरी, वडे,भजे, पापड,करंजी, सांडोळी, कुरडई असे तेलकट पदार्थ शेतात घटामध्ये रात्रभर उघड्यावर ठेवलेले असतात. त्यामुळे सहाजिकच गावातील कुत्रे, मांजरे, शेतातील उंदीर, घुस,खार,पशुपक्षी, नाकतोडे,मुंगी माकोडे व तत्सम किटाणू त्या पदार्थावर खाण्यासाठी ताव मारून धान्याची काही दाणे अस्तव्यस्त करू शकतात.किंवा हवेने काही पदार्थ अस्तव्यस्त होऊ शकतात. दुसऱ्या दिवशी सूर्योदयापूर्वी कथित निळावती विद्या प्राप्त चंद्रभान महाराजांचे वंशज असलेले पुंजाजी महाराज व त्यांचे सहकारी सारंगधर वाघ हे घटातील दाणे किती बोटे इकडे तिकडे सरकली याचे मोजमाप करून भविष्यवाणी कथन करतात ही हास्यास्पद बाब आहे. जर पिकपाण्याची भाकिते खरी असती तर निदान भेंडवळ चे सर्व शेतकरी तरी श्रीमंत दिसले असते. शेतकऱ्यांचा पीक पाणी हा जिव्हाळ्याचा विषय असल्याने केवळ जिज्ञासेपोटी परिसरातील काही लोक तेथे जमुन कुतुहलापोटी भाकीते ऐकतात. परंतु मागील वर्षाचे कोणती भाकिते खरी ठरली याचा कोणीही फारसा पडताळा किंवा नोंदी घेत नाही.जसे मागील वर्षी घटातील पुरी गायब असल्याने पृथ्वीला धोका आहे म्हणजे महापूर,भूकंप, सुनामी यासारखे नैसर्गिक संकट येईल असे भाकीत सांगितले होते परंतु तसे काहीच घडले नाही. उडीद मुगाचे पीक साधारण सांगितले होते परंतु प्रत्यक्षात उडीद मुगाचे पीक काहीच आले नाही. तसेच चारा पाण्याचे प्रतीक असलेली सांडोळी कुरडई घटातून गायब असल्याने चारा पाण्याची प्रचंड टंचाई निर्माण होईल असे भाकीत होते परंतु मागील वर्षी चारापाणी मुबलक प्रमाणात उपलब्ध होते. बरीच पीके ही सर्वसाधारण व मोघम स्वरूपाची सांगितले जातात त्यामुळे ती पिके कशीही आली तरी त्या पिकांचा सोयीने अर्थ घेतला जातो. सोयाबीन हे मुख्य पीक असूनही त्याला घटामध्ये थारा नाही.पाऊस हा काल स्थल परत्वे कोठे कमी तर कोठे जास्त पडत राहतो त्यामुळे पावसाच्या भाकीतांचा निश्चित पडताळा घेता येत नाही.अंधश्रद्धा निर्मूलन समितीने गेल्या पंचवीस वर्षापासून सर्व भाकितांचा बारकाईने अभ्यास केला आहे. त्यामुळे दरवर्षी कितीतरी भाकिते चुकीचे ठरतात, अशा चुकीच्या ठरलेल्या भाकितांचा कोणीही सर्वसामान्य व्यक्ती विचार करत नाही. जी काही भाकिते खरी ठरतात अशा भाकितांचा उदोउदो केला जातो. त्यामुळे सर्व भाकिते खरी ठरतात असा भास निर्माण केला जातो. आतापर्यंत काही चुकीच्या ठरलेल्या काही ठळक भाकितांचा विचार केल्यास असे सांगता येईल की, मे 2013 मध्ये घटात पुरी कायम असल्याने पृथ्वीवर संकट येणार नाही असे भाकीत सांगितले होते प्रत्यक्षात उत्तराखंड राज्यात हरिद्वार येथे प्रचंड महापुरामुळे हजारो लोक मृत्युमुखी पडले होते

https://www.facebook.com/watch/?v=3019045945082135

उलट मे 2011 मध्ये घटातील पुरी गायब असल्याने पृथ्वीचा विनाश होईल असे भाकीत असूनही पृथ्वी पूर्णपणे शाबूत राहिली. तसेच मे 2008 मध्ये घाटातील करडीचे दाणे सुरक्षित असल्याने संरक्षण व्यवस्था मजबूत सांगितली होती तरीसुद्धा मुंबईत 26/11 चा मोठा दहशतवादी हल्ला झाला होता. मे 2007 मध्ये घटात अज्ञात पशूच्या पावलामुळे नैसर्गिक आपत्ती येऊन देशाला धोका निर्माण होईल असे भाकीत सांगितले होते, प्रत्यक्षात त्यावर्षी कोठेच काहीच घडले नाही. तसेच एप्रिल 2004 मध्ये राजाचे प्रतीक असलेली सुपारी घटात कायम असल्याने राजा कायम राहील असे भाकीत सांगितले होते परंतु पंधरा दिवसातच मतमोजणीनंतर अटल बिहारी वाजपेयी यांच्या ऐवजी मनमोहन सिंग पंतप्रधान झाले होते.त्यामुळे अशी कितीतरी ठळक भाकिते खोटी ठरल्याचे उदाहरणे सांगता येतील. तरी प्रत्येक शिक्षित व सुजाण नागरिकांनी चिकित्सक व जिज्ञासू वृत्तीने घटातील प्रत्येक नैसर्गिक घटनांचा कार्यकारण भाव समजून घेतला पाहिजे.अशा अशास्त्रीय भाकितांवर विश्वास ठेवल्यामुळे परावलंबी मानसिकता बनते, बुद्धिप्रामाण्यवाद लोप पावतो, सत्यशोधक वृत्ती दुर्बल होते व समाजात अंधश्रद्धा अजून वाढीस लागतात. मनुष्य दैववादावर विसंबुन राहिल्यामुळे स्वकर्तृत्वपणा कमी होतो व सामाजिक स्वास्थ्याला धोका निर्माण होतो. त्यामुळे अशा निराधार भाकीतांवर सुजाण नागरिकांनी विश्वास ठेवू नये असे अंनिसचे वतीने आवाहन करण्यात आले आहे.

Related posts

आमदारांच्या वाहन चालकांना मिळणार पगार

nirbhid swarajya

टिव्ही जर्नलिस्ट असोसिएशनच्यावतीने मुख्यमंत्र्यांकडे विविध मागण्याचे निवेदन

nirbhid swarajya

गुंजकर कॉलेजमध्ये ११ वी,१२ वी, बीए, बीकॉम,बीएस्सीची प्रवेश प्रकिया सुरू

nirbhid swarajya
error: Content is protected !!