खामगाव : सामान्य रुग्णालय खामगाव येथे दाखल करण्यात आलेल्या कोरोना बाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत. त्यामध्ये आलमपुर ता नांदुरा , जळका भडंग ता खामगाव व गोपाळ नगर खामगाव येथील रुग्णांचा समावेश आहे. त्यापैकी आज सायंकाळी तीन रुग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली. मागील दहा दिवसांपासून कुठलेही लक्षण नसल्यामुळे शासनाच्या नवीन निकषानुसार या रुग्णांना सुट्टी देण्यात आली आहे. यामध्ये नांदुरा येथील २० वर्षीय युवक, जळका भडंग येथील २५ वर्षीय पुरुष व गोपाळ नगर खामगाव -उमरा लासूरा येथील ६० वर्षीय आजोबांचा समावेश आहे.
खामगाव येथील जिया कॉलनी येथे मुंबई येथून आलेली एक महिला कोरोना पॉझिटीव्ह व उमरा लासुरा येथील एक वृद्ध कोरोना पॉझिटीव्ह आढळल्यामुळे जिया कॉलनी व तो वृद्ध गोपाळ नगर येथे काही तासांसाठी नातेवाईकांकडे आला असल्याने हा परिसर सील करण्यात आला होता मात्र जिया कॉलनी येथील महिलेचा मृत्यू झाल्याने खामगाव शहरात खळबळ उडाली होती. मात्र आज या ६० वर्षीय वृद्ध आजोबांसह २ युवक कोरोनामुक्त झाल्याने या रुग्णांना जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रेमचंद पंडित यांच्या हस्ते डिस्चार्ज पेपर देण्यात आले. याप्रसंगी रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. टापरे उपस्थित होते. रुग्णालयातून बाहेर पडताच रुग्णांचे टाळ्या वाजवून स्वागत करण्यात आले. कोरोना वर मात केल्यामुळे आनंदित होऊन हे रुग्ण घरी परतले. शासनाने रुग्णवाहिकेच्या माध्यमातून रुग्णांना घरपोच सोडले. ६० वर्षीय आजोबांसह २ युवकांनी कोरोनावर मात केली तसेच खामगाव शहरामध्ये एकही कोरोना बाधित रुग्ण नसल्याने खामगावकरांसाठी ही दिलासादायक बाब आहे. परंतु अजुन ही आपली जबाबदारी संपली नसल्याने प्रत्येकाने घरी राहून प्रशासनाला सहकार्य करावे.