खामगांव : मनुष्य हा नेहमी सुख, समाधान व आनंदाच्या शोधात असतो. मात्र तो कधीच तृप्त होत नाही. त्याच्या मनाला बाहय बाबी सुखावत असतात मात्र त्याचा अंतराआत्मा थकुन जातो, निराश होतो. त्याची भुक कधी भागतच नाही. हया अंतरात्म्याचा आवाज कधी आपल्याला ऐकूच येत नाही किंवा आपण तो ऐकुनही न ऐकल्यासारखा करतो. अंतरात्म्याचा आवाज ऐकु न येणे ही स्थीती फार भयंकर आहे. मात्र ज्याला ज्याला अंतरात्म्याचा आवाज ऐकु येतो, तो अंर्त:मुख होतो. आत्मा मग मनबुध्दीला व्यक्त होतो. मनबुध्दी देहावर नियंत्रण करते, आत्मा देहाद्वारे अभिव्यक्त होतो. तेंव्हा कलेचा जन्म होतो. मुळात आत्म्याचे स्वरूपच सत्य शिव आणी सुंदर असल्याने त्याची अभिव्यक्ती ही अत्यंत पवित्र व आनंददायी असते. कोणत्याही कलाकृतीला जन्म दिल्यानंतर कलाकार तृप्त होत नाही, परंतु या अतृप्तीतून कधीही दु:खाचा जन्म होत नाही, तर आत्म्याच्या अभिव्यक्तीचा निरंतर विकास होतो. कलाकाराची कला समृध्द होत जाते, आणी कलाकार परमात्म्याच्या स्वरूपात समर्पित होतो. एवढी कला महत्वाची आहे.
आज भौतीकतेच्या आहारी गेलेल्या जगात फार कमी लोक सात्वीक कलेची साधना करतात, आपल्या परीसरातील अशाच एका उदयोन्मुख कलाकाराची ओळख या लेखाच्या माध्यामातुन आपल्याला व्हावी. त्यातुन प्रेरणा मिळावी, आणखी कोणाच्या आत्म्याला अभिव्यक्त होण्याची संधी मिळावी, हया करीता हा लेखनप्रपंच…
खामगाव येथील दिवाणी व फौजदारी न्यायालयात वकीलीच्या माध्यमातून जनसेवा करतांना अॅड. जागृती देशमुख, यांनी त्यांच्या आत्म्याला अभिव्यक्त करण्यासाठी कलेची जोपासनाही केली आहे. त्यांना संगीत, तबला, बासरी हे वादय वादन , कविता व स्फुट लेखन, चित्रकला या सोबतच रांगोळी मधून त्यांच्या आत्म्याला अभिव्यक्त करण्याची साधना त्यांनी साध्य केली आहे. रांगोळीच्या थरांमधून अंतरीच्या भावना व्यक्त करणं तसं कठीणच परंतु सतत प्रयास, नविन शिकण्याची आवड, यातून त्यांच्यातला कलाकार प्रगल्भ होत आहे. रांगोळीची कला अत्यंत प्राचिन आहे, त्यामुळे तिचा उगम नेमका केंव्हा झाला हे सांगता येणार नाही. मात्र साधारणत: दोनहजार वर्षांमधील साहित्यात रांगोळी या कलेचा उल्लेख आढळतो. सोमेश्वराच्या ‘’मानसोल्लास’’ या ग्रंथात व श्रीकुमाराच्या
‘’’शिल्परत्न’’ या ग्रंथात क्षणिकचित्र किंवा धुलीचित्र असे संबोधन्यात आली ती रांगोळीचीच कला असावी, असे समजण्यास जागा आहे. चला तर पाहु या त्यांच्या काही निवडक कलाकृती …
मातेप्रती समर्पित कला…
अॅड. जागृती यांचे वडील रमेशचंद्र देशमुख, भारतीय सैन्यातील एक योध्दा होते त्यांचे मृत्युनंतर श्रीमती मिराबाई देशमुख यांनी दु:ख गीळून सर्व लेकरांना लहानाचे मोठे केले. उत्तम संस्कार देणारी आई व सर्व गरजा पुर्ण करणारे वडील या दोन्ही जबाबदा-या त्यांनी सांभाळल्या, त्या आईच्या चेह-यावरील कष्ट, समाधान त्याग व समर्पणाच्या रेषा रेखाटतांना अॅड. जागृती देशमुख यांचे डोळे कितीच वेळा भरून आले असतील….. मात्र आईच्या चेह-यावरील अभिमानाच्या छटा त्यांनी समर्थपणे त्यांच्या कलेतुन दर्शवल्या आहेत. दिव्यत्वाची जेथे प्रचिती तेथे कर माझे जुळती…..
कला साधना समर्पणातुन साकारली श्रीगणेशमुर्ती ….
विदयेची व कलेची देवता भगवान श्रीगणेश त्यामुळे प्रत्येक कलाकार त्याच्या कलेतुन श्री विनायकाची पुजा बांधतच असतो. गजवदनाचे तर रूपही मनोहर आहे, त्याच्या दर्शनाची आस प्रत्येकाला लागली असते, कोणत्याही आकारात सहज व्यक्त होणारी ही देवता आहे, त्यामुळे श्रीगणेशाला समर्पीत होण्याचा मोह अॅड. जागृती देशमुख, यांना तरी कसा आवरेल…… त्यांच्या रांगोळीतून साकारली ही गणनायकाची महन्मंगल रूपे ….या रांगोळीतील प्रतिमेचे डोळे भक्तांना आर्शिवचन देण्याकरीता अधिर झालेली दिसतात. रांगोळीच्या रंगातून हया अप्रतिम छटा निर्माण करतांना लागणारी एकाग्रता म्हणजेच ‘’ साधना ‘’
कुटूंबवत्सलतेचा प्रभाव लाडकी भाची अन लाडाचा भाऊराया ….
रांगोळीच्या रंगातुन व्यक्तीचित्र साकारने अतिशय कठीण ! आपल्या चेह-यावर अनेक भाव व रंगछटा असतात, रांगोळीतून हया छटा साकारतांना कलाकाराची दमछाक होत असते, परंतु ज्या व्यक्तीचा चेहरा काढायचा आहे, त्याची छवी अंत:करणात दृढ असल्याने, हया छटा कलाकाराच्या हातातुन केवळ समर्पणाच्या आणी एकाग्रतेच्या एकत्रीकरणातून निर्माण होत असतात. अॅड. जागृती देशमुख यांची लाडकी भाची यशस्वी…. तीच नाव सदानकदा मावशीच्या तोंडातच असत… माझी यशु …. आणी म्हणूनच यशस्वीच्या चेह-यावरील निरागसता त्यांना रांगोळीतून अभिव्यक्त करता आली….
लहानपणाचा एकुलता एक सवंगडी, अॅड. जागृती यांचा लाडका भाऊ दशरथ ऊर्फ भुषण रमेशचंद्र देशमुख … प्रत्येक विचार भाव- भावना हया भुषणला सहज सांगायच्या, तो देखील आपल्या बहीणीला पुर्णपणे समजुन घेतो, तिच्या पाठीशी उभा राहतो, तिला आधार देतो. तिचं प्रत्येक स्वप्न साकार करण्याकरीता कष्टांची भींत उभी करू शकतो. परिस्थीतीला समजुन खंबीरपणे तोंड देणारा, कधीच निराश न होणारा … बहीणीच्या चेह-यावरचं हसु पाहून थकवा विसरून शांतपणे झोपणारा… भाऊ देखील या बहीणीच्या रांगोळीतून साकारल्या गेला….
रांगोळीतुन साकारली संस्कार व श्रध्देची प्रतीके
अॅड. जागृती हयांची सामाजिक व धार्मीक श्रध्देची प्रतीके देखील अत्यंत पुजनिय अशी आहेत. हया श्रध्दास्थानातूनच आपल्याला प्रेरणा मिळत असते. त्यामुळे हिंदुधर्म साम्राज्य स्थापन करणा-या राजमाता जिजाऊ मांसाहेबांच्या व्यक्तीमत्वाची भुरळ जागृतीला पडली नसती तर नवलच…. त्यातूनच साकारली राजमाता जिजाऊंची रांगोळी…
छत्रपती राजे संभाजी मुर्तीमंत शौर्य आणी धर्माभिमानाचे प्रतिक ….. तेही साकारले रांगोळीतून ………..
जगमे सुंदर है दो नाम … चाहे कृष्ण कहो या राम …..
भगवान प्रभु रामचंद्र आणी भगवान श्रीकृष्ण हे सर्वांचे आराध्य आहेत. धर्म संस्कृतीची ही प्रतिके…. प्रभु रामचंद्र मर्यादा पुरूषोत्तम पितृवचनाच्या पालनाकरीता राजपाटाचा त्याग करून वल्कले धारण करणारा राम…. दृष्टांचे निर्दालन व सज्ज्नांचे सरंक्षण करणारा श्रीकृष्ण यांच्या रूपाची भुल प्रत्येकालाच पडते आणी प्रत्येक कलाकार आपल्या कलेच्या आधारे या प्रतिकांची पुजा बांधतोच बांधतो ….. चला तर आता आपण पाहूया श्रीकृष्णाची बासरी वाजवतांना लागलेली तंद्री, एकतानता तर प्रभु रामचंद्राच शितल रूप अॅड. जागृती देशमुख यांच्या रांगोळीतून ….
एकतरी अंगी असु दे कला नाहीतर काय फुका जन्मला …. परमेश्वराची प्राप्ती करण्यासाठी कलामार्गातुनही साधना करता येते, कला म्हणजे आत्मानुभूतीची अभिव्यक्ती ….जीवनाच्या धकाधकीत वेळ काढून कलेची साधना करता येते. कलेतून होणारी अभिव्यक्ती म्हणजे आत्मरूपाचे प्रगटन असते म्हणूनच ते पवित्रही असते. त्यामुळे प्रत्येकाने एखादी कला साध्य करण्याकरीता अखंड साधना करण्याची प्रेरणा मिळावी, ही इच्छा ठेवून अॅड. जागृती देशमुख यांच्या व्यक्तीरेखेतील एका वैशिष्टयाची दखल घ्यावी, याकरीता हा लेखन प्रपंच …
शब्दांकन : अॅड. क्षितीज ना. अनोकार खामगाव