पिंपळगाव राजा पोलिस स्टेशन शिवाजी नगरशी जोडले
खामगाव : कोरोना विषाणू संक्रमणाच्या विळख्यात सापडल्याने पिंपळगाव राजा पोलिस स्टेशन चर्चेत आले आहे.या पोलिस स्टेशनमधील ४ कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह आढळून आलेत. त्यामुळे उपनिरिक्षकांसह १९ कर्मचारी क्वारंटीन करण्यात आले. त्यामुळे पिंपळगाव राजा पोलिस स्टेशन आता पुढील आदेशापर्यंत शिवाजी नगर पोलिस स्टेशनशी जोडण्यात आले.पिंपळगाव राजा पोलिस स्टेशनच्या पोलीस निरिक्षकांसह 4 कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले होते. त्यानंतर पोलिस स्टेशनमधील काही कर्मचाऱ्याचे कुटुंबियही कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत.
पि. राजा पोलिस स्टेशनमधील 19 आणि पोलिसांच्या हायरिक्स संपर्कातील तब्बल २६ जणांना क्वारंटीन करण्यात आले. कोरोना आपत्तीमुळे पिंपळगाव राजा पोलिस स्टेशनचा संपूर्ण कारभार विस्कळीत झाला आहे. कोरोना विषाणू संक्रमणाचा वाढता उद्रेक रोखण्यासाठी विविध उपाययोजना करताना पोलिसच कोरोना संक्रमणाला बळी पडताहेत. पिंपळगाव राजा पोलिस स्टेशनमधील ठाणेदार, लेखनिस, बीट पोलिस आणि त्याच्या परिवारातील सदस्य कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. त्यामुळे संपूर्ण पोलिस स्टेशनच सील करण्यात आले.पोलिस कर्मचाऱ्यांसोबतच त्यांचे कुटुंबियही कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्यामुळे पोलिस स्टेशनमधील सर्वच कर्मचारी क्वारंटीन असल्याने पुढील आदेश येईपर्यंत सदर पोलिस स्टेशन शिवाजी नगर पोलिस स्टेशनशी जोडण्यात आले आहे असे उपविभागीय पोलिस अधिकारी प्रदीप पाटील यांनी सांगितले आहे.