राष्ट्रीय महामार्गावरील खड्डे बनले डोकेदुखी; बांधकाम विभागाचे दुर्लक्ष….
खामगाव: पावसाळा आला की खामगावात जागोजागी खड्डे पडून वाहतूककोंडीला सामोरे जावे लागते. या त्रासातून काही प्रमाणात सुटका व्हावी यासाठी वाहतूक पोलिसांवर पुढाकार घेऊन खड्डे बुजविण्याची वेळ आली आहे. शिवाजी नगर पोलीस स्टेशनच्या वाहतूक पोलिसांनी हातात फावडे आणि घमेली घेऊन खामगाव-नांदुरा रोड वरील एमआयडीसी टर्निंग वरील खड्डे आज रविवारी बुजविले.त्यांच्या या खड्डे बुजविण्याच्या उपक्रमाची नागरिकांनी प्रशंसा केली आहे. खामगाव-नांदुरा रोड वरील एमआयडीसी टर्निंग रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. परिणामी या ठिकाणी वाहतूक कोंडी होते नांदुरा कडून येणाऱ्या व खामगाव कडून नांदुरा कडे जाणाऱ्या वाहनांना याचा मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे. टर्निंग खालील भागात खड्डे पडले आहेत.’बांधकाम विभागाने ने हे खड्डे भरणे आवश्यक होते,
मात्र त्यांनी हे काम केलेले नाही.तसेच कंत्राटदाराने बुजविलेले खड्डे काही दिवसांत पुन्हा पडले आहेत,अशी माहिती स्थानिकांनी दिली. त्यामुळे हे खड्डे बुजविण्यासाठी वाहतूक पोलिसांना रस्त्यावर उतरावे लागले.’सतत पडणाऱ्या खड्ड्यांमुळे या रस्तावर कायमच अपघात होत असतात. त्यावर बांधकाम विभाग आणि नॅशनल हायवे विभाग व त्यांचे अधिकारी, प्रशासन हे काही उपाययोजना करत नसल्याने स्थानिकांना त्रासाला सामोरे जावे लागते,’असे स्थानिक नागरिकांनी निर्भिड स्वराज्य सोबत बोलतांना सांगितले आहे
१० हून अधिक खड्डे बुजवले
‘खड्ड्यांमुळे वाहनांची पाटे तुटत होते,रोज अपघात होत,खड्डे मोठे असल्याने ट्रक पलटी होण्याचा धोका सुद्धा होता,या रोडवर एमआयडीसी असल्याने अनेक कंपन्या आहेत त्यात असलेले कामगार सुद्धा मोठ्या प्रमाणात या रस्त्यावर ये-जा करत असतात त्यांच्या सुद्धा वाहनाचे अपघात घडत होते.त्यामुळे तीन ठिकाणचे सुमारे १० हून अधिक खड्डे बुजविले त्यामुळे अपघातची संख्या कमी होईल, अशी अपेक्षा पोलिसांनी व्यक्त केली आहे.या उपक्रमात शिवाजी नगर पोलीस स्टेशन चे वाहतूक पोलिस कर्मचारी पोलीस हेडकॉन्स्टेबल किरण राऊत,नापोका संतोष इटमल्लू,नापोका अरविंद बडगे,पोका रफिक शहा,पोका सतीश जाधव,पोका संदीप गुळवे यांनी हे खड्डे बुजविले,’अशी माहिती वाहतूक शाखेचे पोलीस हेडकॉन्स्टेबल किरण राऊत यांनी दिली आहे