महसूल मंत्री बाळासाहेब थोरात व यशोमती ठाकूर यांच्याकडे केली मागणी
खामगाव : खामगाव महसूल उपविभागातील प्रशासकीय अनागोंदी टाळण्यासाठी व कोरोना संसर्गजन्य परिस्थिती वर नियंत्रण मिळविण्यासाठी रिक्त असलेले उपविभागीय अधिकारी पद तातडीने भरण्यात यावे अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमेटीचे अमरावती विभागीय समन्वयक धनंजय देशमुख यांनी मा.ना.श्री.बाळासाहेब थोरात महसूल मंत्री व बुलडणा जिल्हा संपर्कमंत्री ना.यशोमतीताई ठाकूर यांच्याकडे केली आहे. यासंदर्भात त्यांनी दिलेल्या पत्रामध्ये नमुद आहे की, खामगाव येथील उपविभागीय महसूल अधिकारी यांची शासनाचे वतीने इतरत्र बदली करण्यात आली आहे.
त्यामुळे गेले अंदाजे तीन ते चार आठवड्यांपासून येथील पद रिक्त आहे. या कारणास्तव प्रशासकीय व्यवस्थापन ढेपाळले आहे. तसेच कोरोना संसर्गात मोठ्या प्रमाणावर वाढ झाली असून रूग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. या कारणामुळे खामगाव परिसरात प्रशासकीय स्तरावर योग्य निर्णय घेण्यासाठी सक्षम उपविभागीय अधिकारी नियुक्त करणे अत्यंत गरजेचे आहे. या यासंदर्भात अत्यंत गांभिर्याने दखल घेवून उपविभागीय अधिकारी पद तातडीने भरावे अशी मागणीही धनंजय देशमुख यांनी केली आहे.