संग्रामपूर : मेळघाट व्याघ्र प्रकल्पांतर्गत संग्रामपूर तालुक्यातील आदिवासी ग्राम वसाली येथील पर्यटक स्थळ इको सायन्स पार्कमध्ये आज दुपारी अचानक आग लागल्याने परीसरात भितीचे वातावरण निर्माण झाले होते. पार्कमधील गवताने पेट घेतल्याने आगीचे लोट मोठ्या प्रमाणात दिसून येत होते. पार्कमध्ये वेल्डिंगचे काम सूरू असल्याने आग लागली असावी असा अंदाज आहे. काही कालावधीतच आगीचे तांडव सुरू झाले होते. पार्क मध्ये लागलेल्या आगीचे लोट वसाली गावाकडे येत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. इको सायन्स पार्कला लागून आदिवासी बांधवांची वस्ती सुरू होते. वस्ती लगत असलेल्या घरांकडे आगीची वाटचाल पाहता गावकऱ्यांनी पार्कमध्ये धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवल्याने पुढील अनर्थ टळला.
या आगीमध्ये पार्क मधील गवत जळून खाक झाले असून इतर नुकसान झाले नसल्याचे वन्यजीव विभागाकडून सांगण्यात आले आहे. वन्यजीव विभागातील कर्मचारी व आदिवासी बांधवांनी वेळीच आग नियंत्रणात आणून विझविली. अंबाबरवा अभयारण्यात जंगल सफारी साठी येणाऱ्या पर्यटकांसाठी वसाली येथे ३२ कोटी रुपयांच्या वर खर्च करून ईको सायन्स पार्कची उभारणी करण्यात येत आहे. ३० हेक्टर क्षेत्रफळावर उभारण्यात येत असलेल्या उद्यानात २८ एकर क्षेत्रात २५ हजाराच्यावर वृक्षलागवड करण्यात आली आहे. यात नारळ, आंबा, सिताफळ, बांबू व फुलझाडांचा समावेश आहे. सदर वृक्षलागवड ईको नक्षत्र वनात करण्यात आली असून पार्कच्या दूसय्रा भागात आग लागली होती. कंत्राटदाराकडून पार्कमध्ये पर्यटकांसाठी खोल्यांचे बांधण्याचे काम सुरू आहे. लोखंडी पाईप, कापणे जोडण्यासाठी वेल्डिंग मशीन उपयोगात आणण्यात येत असल्याची चर्चा गावकरी करत आहे. त्यामुळे आग लागली का ? की अजून कोणत्या कारणामुळे आग लागली अजून हे स्पष्ट झाले नाही.