• ऑक्सीजन स्तर कमी असलेल्या नागरिकांची कोरोना तपासणी करावी
बुलडाणा : जिल्ह्यात मलकापूर शहर व तालुक्यात सर्वात जास्त कोरोनाचे पॉझीटीव्ह रूग्ण आढळून आलेले आहे. शहरातील वाढता संसर्ग रोखण्यासाठी महत्तम प्रयत्न करणे गरजेचे आहे. त्यानुसार स्थानिक लोकप्रतिनिधी, नगरसेवक यांच्या सहभागाने कोरोना संसर्ग रोखण्यासाठी वॉर्ड निहाय समित्यांची स्थापना करण्यात येत आहे. या समितीमध्ये सामाजिक कार्यकर्ते, डॉक्टर व स्वत:हून काम करण्यास इच्छूक असलेल्या नागरिकांचा समावेश असणार आहे. ही समिती कोरोना संसर्ग रोखण्यासाठी महत्वाची भूमिका पार पाडणार असून नागरिकांनीही या समितीला सहकार्य करावे, असे आवाहन पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी आज केले. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन समिती सभागृहात आज मलकापूर कोरोना संसर्ग नियंत्रण आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी व्यासपीठावर आमदार राजेश एकडे, नगराध्यक्ष हरीष रावळ, जिल्हाधिकारी सुमन चंद्रा, जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. दिलीप पाटील- भुजबळ, जि.प मुख्य कार्यकारी अधिकारी षण्मुगराजन एस आदी उपस्थित होते. सभागृहात संबंधित अधिकारी, शहरातील लोकप्रतिनिधी उपस्थित होते. मलकापूर शहरात आरोग्य विभागाच्या माध्यमातून सर्वेक्षण होत असताना त्यामध्ये दुर्धर आजार असलेल्या नागरिकांची वेगळी नोंद ठेवण्यात यावी, अशा सूचना देत पालकमंत्री म्हणाले, दुर्धर आजार असलेल्या नागरिकांना कोरोनाची लागण लवकर होण्याची शक्यता असते. त्यामुळे कोरोना संसर्ग झाल्यास अशा नागरिकांची नोंद असल्यास त्यांना लवकर शोधून काढणे सोयीचे होईल. आरोग्य तपासणीमध्ये नागरिकांनी स्वत:हून पुढाकार घेत सहकार्य द्यावे. त्यासाठी नागरिकांची मानसिकता बदलणे गरजेचे आहे. कोरोनाविषयी जनजागृती करावी. घाबरून न जाता कोरोना बरा होतो, हा विश्वास नागरिकांमध्ये निर्माण करावा लागणार आहे. ते पुढे म्हणाले, प्रशासनामार्फत तपासणीदरम्यान तापमान व ऑक्सीजन स्तर तपासण्यासाठी साधने उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच अधिक संसर्ग असलेल्या भीमनगर भागात एक्स रे मशीनही उपलब्ध करून देण्यात आली आहे. तरी ऑक्सीजन स्तर 90 च्या खाली असलेल्या नागरिकाची कोरोना तपासणी करण्यात यावी. यंत्रणांनी आपसात समन्वय ठेवून कोरोना संसर्ग कमी करण्यासाठी कार्यवाही करावी. शहरात सर्वानुमते कडक संचारबंदी लागू करावी. अत्यावश्यक सेवांसाठी कमीत कती वेळ सवलत देवून उर्वरित वेळेत संपूर्ण कडक संचारबंदी असावी. संसर्गाची साखळी नष्ट करावी. व्यापारी असोसिएशन, मेडीकल दुकानदार यांची बैठक घेवून वॉर्डनिहाय कार्यक्रम नियोजीत करावा. पोलीस प्रशासनाने लग्न समारंभात 50 पेक्षा जास्त नागरिक असल्यास गर्दी नियंत्रणात ठेवण्यासाठी कारवाई करावी, अशा सूचनाही पालकमंत्री यांनी यावेळी दिल्या. आमदार राजेश एकडे यावेळी म्हणाले, मलकापूर शहरात अत्यावश्यक सेवेसाठी वेळ देवून उर्वरित कालावधीत संचारबंदी लागू करावी. तसेच शहरात कोरोना संसर्ग आटोक्यात आणण्यासाठी जाणीव जागृती करावी. शहरातील व्यापारी, डॉक्टर्स यांना विश्वासात घेवून कडक संचारबंदी लावून संसर्ग आटोक्यात आणावा. नगराध्यक्ष हरीष रावळ यांनीसुद्धा याप्रसंगी शहरातील परिस्थिती मांडली. जिल्हाधिकारी सुमन चंद्रा यावेळी म्हणाल्या, ऑक्सीजन स्तर 90 च्या खाली असणाऱ्या नागरिकांचा एक्स रे काढणे आवश्यक आहे. त्यामुळे सर्वेक्षण करणाऱ्या पथकाने एक्स रे काढून घ्यावे. त्याचप्रमाणे प्रतिबंधीत क्षेत्रामध्ये होम डिलीव्हरीची व्यवस्था करावी. या क्षेत्रात कुठलीही ॲक्टीव्हीटी चालणार नाही. सर्वेक्षण करताना आरोग्य सेतू ॲप डाऊनलोड केलेले नसल्यास ते नागरिकांना डाऊनलोड करण्यास सांगावे. त्यामधील कोरोना संसर्ग स्थितीचा आढावा घ्यावा. त्यामधील डाटा अपडेट करावा. जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. पाटील यावेळी म्हणाले, वॉर्डनिहाय समित्या सक्षम करून भाजीपाला, दुध व किराणा विक्री एकाच ठिकाणाहून करावी. सर्वेक्षण करताना घराघरात छोटे रजिस्टर द्यावे. या रजिस्टरमध्ये दैनंदिन तपासणी अंती नोंदी ठेवाव्यात. ही वही संबंधीत कुटूंबाकडेच ठेवावी. याप्रसंगी लोकप्रतिनिधी व शहरातील विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी यांनी आपल्या सुचना मांडल्या. या सुचनांची प्रशासनाकडून योग्य ती दखल घेण्यात आली. उपविभागीय अधिकारी सुनील विंचनकर यांनी तालुक्यात 53 कोरोनाबाधीत रूग्ण असल्याचे सांगितले. तसेच शहरात 8 जुनपासून घरोघरी नागरिकांची आरोग्य तपासणी करून शहरातील 58 हजार लोकसंख्या तपासणीत कव्हर होत असल्याची माहिती दिली. यामध्ये 10 संदीग्ध व्यक्ती आढळून आल्या आहेत. त्यांना क्वारंटाईन करण्यात आले आहे. शहरात 12 प्रतिबंधीत क्षेत्र असून संसर्गाची साखळी तोडण्यासाठी शेवटच्या माणसापर्यंत आरोग्य तपासणी करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. बैठकीचे आभार प्रदर्शन निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. पुरी यांनी केले. बैठकीला संबंधित विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. |