खामगाव : संपूर्ण जगात जेव्हां कोरोनाने थैमान घातले तेव्हा अनेक लोक मानसिक तनावा खाली जगत होते परंतु यावरही अनेकांनी नामी उपक्रम राबवित जनसामान्यांचे मनामनात उत्साह, आनंद निर्माण करण्यासाठी स्तुत्य उपक्रम राबविण्यात वेळ खर्ची घातला. असाच एक स्तुत्य उपक्रम राबवून संपूर्ण जिल्ह्यात आपल्या शाळेचा लौकीक खामगाव तालुक्यातील हिवरखेड येथील जि.प.केंद्रीय मराठी उच्च प्राथमिक शाळेतील शिक्षक, विद्यार्थी ,कर्मचारी व पालक यांनी वाढविला असून ही शाळा अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम सातत्याने राबवित असते. या गावातील शिक्षक, विद्यार्थी, पालक व गावकरी मिळून नवनविन संकल्पना विविध प्रसंगी शाळेत राबवित असतात.मग शालेय पोषण आहार कर्मचारी तरी कसे मागे राहणार ! ग्रामीण भागातील प्रत्येक बालकास पालेभाज्यांनी युक्त परिपूर्ण सकस आहार मिळतोच असे नाही. कारण ग्रामीण भागातील मुले ही वेगवेगळ्या सामाजिक व आर्थीक परिस्थितीतून आलेले असतात व त्यांना सकस आहार नियमित मिळावा करीता शालेय परिसरात पालेभाज्या निर्मिती प्रकल्प सुरु केला. शाळेतील मुख्याध्यापक व शिक्षकांची विविध शैक्षणिक बाबींवर सहविचार सभा होत असते. या सहविचार सभेत शाळेतील विविध शैक्षणिक समस्या व उपाययोजनांवर विचार विनिमय करतात. या सभेत शाळेतील बालकांमधील जीवनसत्वांची उणीव यावर चर्चा सुरू झाली व यातून संकल्पना पुढे आली की विद्यार्थ्यांना घरी जरी पालेभाज्या कमी खायला मिळत असतील तरी आपण यासाठी शाळेच्या परिसरातच पालेभाज्यांची लागवड केली तर ! या पालेभाज्यांचा वापर शालेय पोषण आहारात मागील शैक्षणिक सत्रामध्ये. पहिल्या वर्षी पालक, कोथिंबीर व मेथीची लागवड केली. पण या अरूंद जागेत एक तर झाडे असल्याने पुरेसा सूर्यप्रकाश पोहोचत नव्हता व वावरण्यासाठी जागाही अपुरी पडायची, पुरेसा सूर्यप्रकाश न पडल्याने त्यावर रोग पडला. त्यामुळे पहिल्या वर्षीचा प्रयत्न अशाप्रकारे अयशस्वी झाला.तरीही हताश न होता लाॅक डाऊन काळात हताश न होता परिस्थितीवर मात करून शाळेतील शालेय पोषण आहार शिजविणारे मजूर गोपालभाऊ पाचनकर व त्यांची पत्नी सौ.सुनिताताई गोपाल पाचनकर यांनी यावर्षी उन्हाळ्याच्या सुटीपासून लाॅक डाऊन काळात शालेय परिसरातच दुस-या मोठ्या जागी अतिशय कष्टाने आदर्श परसबाग पुन्हा नव्याजोमाने व कष्टाने फुलविली आहे. उन्हाळ्याच्या सुटीत त्यांनी दोन ट्रॅक्टर गाळाची काळी माती शाळेच्या हजार स्वेअर फूट क्षेत्रातील रिकाम्या जागी आणून टाकली. त्यानंतर आपल्या शेतातील शिल्लक व टाकाऊ ठिंबकचे पाईप आणले. या परसबागेत शालेय पोषण आहारात लागणाऱ्या पालेभाज्यांची लागवड केली व यामधे पालक,मेथी, शेपू,वांगे, टमाटे,कोथिंबीर, मिरची,दोडके, मुळे, वाल, इ.ची या किचन गार्डन मध्येच लागवड केलेली आहे. यात काही पालेभाज्या बीजरोपणातून तर काही बुलडाणा येथील रोपवाटीकेतून रोप मुख्याध्यापक रामदास मिरगे यांनी विकत आणून या उपक्रमास प्रोत्साहन दिले. या परसबागेस आजवर अनेक मान्यवरांनी भेटी दिल्या आहेत.विद्यार्थी, शिक्षक , पालक, कर्मचारी यांच्या सामुहिक प्रयत्नाने ही परसबाग फुलली असून ज्याप्रमाणे शिक्षक आपल्या विद्यार्थ्यांवर प्रेम व संस्कार करतात त्याच प्रमाणे या परसबागेतील पालेभाज्यांवर सुध्दा पर्यावरणपूरक सेंद्रिय संस्कार करण्याचे महान कार्य करीत आहे. आपल्या परसबागेत पर्यावरणपूरक पालेभाज्या निर्मिती करून त्या संबंधित प्रशिक्षण व मार्गदर्शन विद्यार्थ्यांना देण्यात येते. पंचायत समिती खामगावचे सभापती , जिल्हा परिषद समाज कल्याण सभापती,खामगाव तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी गजानन गायकवाड, हिवरखेड केंद्राच्या केंद्रप्रमुख , मूल्यवर्धन मेडिया टीमचे पुणे येथील प्रतिनिधी शिरीष खरे यांनी याबाबत शालेय पोषण आहार कर्मचारी गोपाल पाचनकर यांचे कौतुक केले आहे. उपक्रमाच्या यशस्वितेसाठी मुख्याध्यापक रामदास मिरगे तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी तथा विद्यार्थ्यांचे शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष तसेच सदस्य यांनी कौतुक केले.