बोगस पॅथॉलॉजीवर प्रथमच बडगा; नोंदणी केली रद्द
खामगांव : वैद्यकीय उपचार औषधे यासंदर्भात कडक वैद्यकीय नियमांचे पालन केले जाते.मात्र अशी खबरदारी पॅथॉलॉजी मध्ये करण्यात येणाऱ्या चाचण्यांच्या संदर्भात घेतली जात नाही. याकडे वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञ कायमच लक्ष वेधत असतात. मात्र आता पॅथॉलॉजीमधे होणाऱ्या गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी महाराष्ट्र वैद्यक परिषदेने पाऊल उचलले आहे. या परिषदेने खामगाव येथील पॅथॉलॉजीची व डॉक्टराची नोंदणीच रद्द करून पहिली धडक कारवाई केली आहे. या कारवाईमुळे खाजगी हॉस्पिटलमध्ये गैरप्रकार करणाऱ्या पॅथॉलॉजी करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. बुलडाणा जिल्ह्याीतील खामगाव येथील डॉक्टर अशोक बावस्कर हे आपल्या खाजगी हॉस्पिटलमध्येच अवैधपणे लॅब चालवत होते. या लॅबमधील वैद्यकीय अहवालांवर विसंबून रुग्णांवर औषधोपचार केले जात होते. यासंदर्भातील तक्रारींची शहानिशा केल्यानंतर महाराष्ट्र वैद्यक परिषदेने या लॅबची नोंदणी रद्द केली आहे. नोंदणीकृत अधिकृत पॅथॉलॉजिस्ट नसताना डॉक्टरांनी रुग्णालयामध्ये लॅब सुरू केली होती. यामधील तंत्रज्ञाने केलेल्या निदान चाचण्यांच्या आधारावर वैद्यकीय उपचार दिले जात होते. खामगाव येथील अधिकृत पॅथॉलॉजिस्टच्या संघटनेने यासंदर्भात दोन वर्षांपूर्वी तक्रार दाखल केली होती. त्याची शहानिशा केल्यानंतर दोन महिन्यांसाठी या डॉक्टरांची नोंदणी रद्द करण्यात आली आहे
. इंडियन मेडिकल कौन्सिल ॲक्ट १९५६ कायद्यातील तरतुदीनुसार न्यायालयाने वेळोवेळी दिलेल्या निर्णयांमध्ये हे स्पष्ट केले आहे की, रुग्णांच्या वैद्यकीय अहवालांवर स्वाक्षरी करण्याचे अधिकार हे कौन्सिलशी निगडित असलेल्या नोंदणीकृत पॅथॉलॉजिस्टना आहेत. या पॅथॉलॉजिस्ट शिवाय इतर कोणतीही व्यक्ती लॅबोरेटरी चालवून चाचणी अहवाल प्रमाणित करून देत असेल, तर तो अवैध वैद्यक व्यवसाय ठरतो. त्या व्यक्तीवर महाराष्ट्र वैद्यक व्यवसाय अधिनियम १९६१मधील तरतुदींनुसार कारवाई करण्यात येते असे सुद्धा पॅथॉलॉजिस्ट असोसिएशनचे बुलडाणा जिल्हा अध्यक्ष डॉक्टर विजय गर्ग यांनी निर्भीड स्वराज्य शी बोलताना सांगितले आहे. यावेळी डॉक्टर विजय गर्गे यांनी निर्भिड स्वराज्य सोबत बोलताना सांगितले की, डॉक्टरांच्या वैद्यकीय उपचार पद्धती संदर्भात आग्रही असलेले सर्वसामान्य निदान चाचण्यांवर एमडी डॉक्टरांची स्वाक्षरी आहे का ? ते डॉक्टर लॅबमध्ये उपस्थित आहेत का ? याचीसुद्धा शहानिशा करणे गरजेचे आहे.मात्र बोगस लॅबमध्ये हे सर्व नियम पायदळी तुडवले जातात.ज्याप्रमाणे पॅथॉलॉजी लॅब पॅथॉलॉजिस्ट शिवाय चालवणे अवैध आहे त्याचप्रमाणे स्वतःच्या रुग्णालयांमध्ये अवैधरित्या लॅबोरेटरी चालवणे गैरकायदेशीर आहे.अशा रुग्णांना तपासणीसाठी पाठवणे किंवा केलेल्या चाचणी अहवालांवर विसंबून रुग्णांवर औषधोपचार करणे हे अवैधच आहे.तसेच हे वैद्यकीय परिषदेच्या आचारसंहितेचा भंग करणारे आहे.जिल्ह्यातील एकूण 13 डॉक्टरांची तक्रार पॅथॉलॉजिस्ट असोसिएशन कडून करण्यात आली आहे.त्यामधील खामगाव मधील खाजगी हॉस्पिटलमध्ये सुरू असलेल्या पाच डॉक्टरांची नावे सुद्धा आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील अशा बोगस पॅथॉलॉजी लॅब चालवणाऱ्यावर पॅथॉलॉजिस्ट असोसिएशन तक्रार करून कारवाई करायला लावणार आहे. यासंदर्भात अजून काही मोठे निर्णय लवकरच घेण्यात येतील असे सुद्धा त्यांनी बोलताना सांगितले. खामगाव बोगस लॅब चालवणारे ते 5 डॉक्टर कोण ? याची उत्सुकता आता खामगावकरांना लागलेली आहे.