खामगाव : अलीकडच्या काळात शहरात भरदिवसा लुटमारीच्या घटना घडत आहेत.यामध्ये आता चोरट्यांकडून बँक ग्राहकांना लक्ष्य बनवून लुटण्याच्या घटना घडत आहेत. परंतु एखाद्या ग्राहकाने बँकेतून मोठी रक्कम काढल्याची माहिती बाहेर पाळत ठेवून असलेल्या चोरट्यांना समजते कशी? हा संशोधनाचा विषय बनला असून घटनेवेळी त्यांचा एखादा साथीदार बँकेच्या आत बसवून माहिती पुरवित असावा अशी शंका व्यक्त केली जात आहे. त्यामुळे बँक व्यवस्थापनाने सुद्धा ग्राहकांच्या रकमेच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने दक्षता घेण्याची गरज निर्माण झाली आहे.स्थानिक नांदुरा रोडवरील सेंट्रल बँकेतून २४ जुलै रोजी दिलीप हटकर(५५) रा. हिवरखेड या शेतकऱ्याने ४ लाख ७३ हजाराची रक्कम काढून त्यापैकी ४ लाख ७० हजार रुपये कापडी पिशवित ठेवले होते. बँकेतून बाहेर आल्यानंतर घराकडे जाण्यासाठी दिलीप हटकर हे मुलाच्या दुचाकीवर बसताच पाठीमागून दुचाकीवर आलेल्या दोन भामट्यांनी त्यांच्या हातातील पैशांची पिशवी हिसकावून पोबारा केला. भरदिवसा दुपारी १ वाजाताच्या सुमारास वर्दळीच्या ठिकाणी सदर घटना घडली. परंतु चोरटे दुचाकीवरून पसार होण्यात यशस्वी झाले. शहरात काही दिवसांपूर्वी बँकेतून पैसे काढून घेऊन जाणाऱ्यांना लुटण्याच्या तीन ते चार घटना घडल्या आहेत यातील काही घटना बँकेच्या जवळपास तर काही अंतरावर घडल्या आहेत घटना घडल्यानंतर पोलीस यंत्रणा तपास करते यात काहींचा तपास लागतो तर काहींचा तपासच लागत नाही.बँक ग्राहकांना लुटण्याच्या घटनांना आळा घालण्यासाठी बँक व्यवस्थापनाने उपाययोजना आखण्याची गरज निर्माण झाली आहे. त्यासाठी बँकेच्या आत व बाहेर सीसीटीव्ही कॅमेऱ्याची पुरेशी व्यवस्था करावी व मधील दृश्यांवर नजर ठेवण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था करावी जेणेकरून बँकेच्या बाहेर संशयास्पद स्थितीत वावरणाऱ्या व्यक्तीच्या हालचालीवर लक्ष ठेवता येईल, कारण बँकेच्या बाहेर असलेल्या चोरट्यांना बँकेच्या आत असलेला त्यांचा साथीदार माहिती देत असावा अशी शंका व्यक्त केली जात आहे. यासाठी बँकांनी ग्राहकांच्या रकमेच्या सुरक्षेच्या दृष्टीने ठोस पावले उचलण्याची गरज निर्माण झाली आहे.