बुलडाणा : जिल्हात धीम्या गतीने का होईना परंतु कोरोना बाधितांचा आकडा शतकाच्या उंबरठ्यावर पोहोचला आहे. जिल्ह्यामध्ये रुग्णांची एकूण संख्या 83 वर पोहोचली आहे. मात्र दुसरीकडे रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही बऱ्यापैकी असल्याने समाधान व्यक्त होत आहे. अशातच आज रविवारी आणखीन तीन कोरोना बाधित रुग्ण पूर्णपणे बरे झाले असल्याने त्यांना रुग्णालयातून नियमानुसार सुटी देण्यात आली. जिल्हा शल्य शिकित्सक डॉ. प्रेमचंद पंडित यांनी या रुग्णांना प्रमाणपत्र देऊन शुभेच्छा दिल्या.
बुलडाणा जिल्ह्यात आतापर्यंत 1450 रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत व 54 रिपोर्ट्स हे प्रतीक्षेत आहेत. जिल्ह्यात एकूण 83 कोरोनाबाधित रूग्ण आहेत. यामध्ये 29 रुग्ण हे अॅक्टिव असून त्यापैकी 3 मृत आहे. आतापर्यंत 51 कोरोनाबधीत रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. यातील तिघांना रविवारी कोविड रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली.