रमजान विशेष..
बुलडाणा जिल्ह्यातील मोताळा तालुक्यापासून १२ कि.मी. अंतरावरील रोहिणखेड हे प्रसिद्ध तथा पुरातन वस्ती असणारे गाव आहे. येथे स्थापत्य कलेचा विलोभनीय उदाहरण असलेली मशीद आहे. एकेकाळी निजामशाहीत राजधानीचे शहर म्हणून रोहिणखेड गावाला रोहिणाबाद अशी ओळख होती. या ठिकाणी सन १८८२ मध्ये खुदावतखाँ महमद यांनी बांधलेली पुरातन भव्य मशीद आहे. या मशीदीच्या भिंतीवर कुराणाच्या आयत अरेबिक भाषेत लिहिल्या आहेत. या भिंतीवरील आयतांवरून ओले कापड फिरविल्यास लाल अक्षरातील अक्षरे दिसतात व ओलावा नाहीसा झाला की अक्षरे लुप्त होतात. आजही दर शुक्रवारी विशेष नमाज पठन या ठिकाणी केल्या जाते. या मशीदीचे बांधकाम संपूर्ण दगडामध्ये झाले असून, कला कृतीचा उत्तम नमुना ही मशीद प्रसिद्ध आहे. त्यामुळे या मशीदीला ऐतिहासिक महत्व प्राप्त झालेले आहे. रोहिणखेड गावात या मशीदीसह अनेक ठिकाणी पुरातन वास्तुंचा ठेवा आहे. येथे दोन मोठय़ा लढाया झाल्याचा इतिहास आहे. सन १४३७ च्या सुमारास खान्देशचा सुलतान नजिरखानने त्याचा जावई अल्लाउद्दीन बहामनीवर स्वारी केली. सन १५९० च्या सुमारास अहमदनगरच्या राजकुमार बुरहानने खान्देशचा राजा अलिखानच्या बरोबर जमालखानवर याच ठिकाणी युद्ध केल्याची नोंद आहे. निजामशाहीतील रोहिणाबाद हे राजधानीचे शहर व्यापारासाठी प्रसिद्ध असल्याने सुखी व समृद्ध होते. आता ही वास्तू पुरातत्व विभागाने ताब्यात घेतली आहे. परंतु या खात्याचे मशिदीकडे असणारे दुर्लक्ष ठळकपणे जाणवते. मशिदीच्या काही भागांची पडझड झाली आहे, त्याकडे मात्र कुणाचं लक्ष नाही. रोहिणखेड सारखी अनेक गावे आपल्या अवती भवती आहेत. तेथील अनेक ऐतिहासिक वास्तू भग्न अवस्थेत आहे. त्याची हेळसांड होण्यास जबाबदार कोण, ‘सरकार’ कि ‘समाज’? हा प्रश्न मात्र या ऐतिहासिक वास्तूक विचारू शकत नाही…
साभार : बुलडाणा कट्टा पेज.