नांद्राकोळी येथील शेतकरी गटाची संकल्पना
बुलडाणा : लॉकडाऊन काळात लोकांनी रस्त्यावर येऊन गर्दी करु नये. शेतकऱ्यांचा भाजीपाला विक्री अभावी पडून राहू नये, यासाठी नांद्राकोळी येथील समृद्ध शेतकरी गट व माऊली शेतकरी गट यांच्या माध्यमातून भाजीपाला वितरणाची नवीन संकल्पना अंमलात आणण्यात येत आहे.
ग्राहकांना ताजा भाजीपाला एकाच वेळी घरपोच मिळावा, या संकल्पनेतून कृषी विभाग व कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) अंतर्गत स्थापन झालेल्या सदर शेतकरी गटामार्फत बुलडाणा शहरातील नागरिकांना दैनंदिन आहारात अत्यावश्यक असणारा सर्व प्रकारचा भाजीपाला एकाच बास्केटमध्ये उपलब्ध करून देण्यात येत आहे. सदर भाजीपाला बास्केट आज जिल्हाधिकारी यांच्या दालनात जिल्हाधिकारी सुमन चंद्रा यांना देण्यात आली. यावेळी जिल्हाअधिक्षक कृषि अधिकारी नरेंद्र नाईक, संबंधित शेतकरी गटाचे शेतकरी बांधव उपस्थित होते.
भाजीपाला वितरण करण्यासाठी बास्केट बुकिंग सुरू करण्यात आली आहे. सदर बुकींग दूरध्वनी क्रमांक 976692 3601 व 9423447763 या क्रमांकावर व्हाट्सअप द्वारे करू शकता. तरी शहरातील नागरिकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन तालुका कृषी अधिकारी यांनी केले आहे.
सौजन्य : जि.मा.का