खामगाव : काल रात्री खामगाव शहरासह परिसरात जोरदार पाऊस बरसला. या दरम्यान स्थानिक बारादरी भागातील भाजयुमोचे पदाधिकारी गोलू आळशी यांच्या घराची भिंत कोसळून मोठे नुकसान झाले. मात्र वेळीच आळशी कुटुंबीय घराबाहेर पडल्याने थोडक्यात अनर्थ टळला. सायंकाळपासूनच पावसाचे वातावरण निर्माण झाले होते. रात्री ८.३० वाजेदरम्यान शहरात जोरदार पावसाला सुरुवात झाली. सलग दोन तास संततधार पाऊस सुरु होता.यावेळी आळशी यांच्या घरालगत खोदून ठेवलेला खड्डा पाण्याने पुर्णपणे भरला. हे लक्षात येताच गोलू आळशी यांनी प्रसंगावधान दाखवत आपण आजच्या रात्री आत्याकडे झोपायला जावू असे म्हणत कुटुंबियांना घराबाहेर काढले आणि याचक्षणी त्यांच्या घराची भिंत कोसळली.
यामुळे आळशी कुटुंबीय थोडक्यात बचाचले. मात्र भिंत कोसळल्याने घरातील फ्रिज,कपाट, महत्वपूर्ण कागदपत्र यासह साहित्याचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले.घराची एका बाजूची संपूर्ण भिंत कोसळल्याने संपूर्ण घरात पाणी साचले.यामुळे आळशी कुटुंबीय रस्त्यावर आले. गेल्या वर्षभरापासून नागेश्वर यांनी माझ्या घरालगत तळघर बांधकामासाठी भला मोठा खड्डा खोदून ठेवलेला आहे. वारंवार सांगूनही त्याने बांधकाम केले नाही. या खड्डयामुळे माझ्या घराच्या भिंतीला तडे गेले होते.कालच्या पावसाने खड्डयात पूर्णपणे पाणी साचून माझ्या भिंतीत मुरले आणि त्यामुळेच माझ्या घराची भिंत कोसळली,असा आरोप गोलू आळशी यांनी केला आहे.