खामगाव : संपुर्ण देशासह राज्यामधे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढताना दिसत आहे.अशातच जिल्ह्यातही कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत, एकीकडे शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट असताना परवाना मध्ये समावेश नसलेल्या ठिकाणी रासायनिक खत साठवून ठेवल्यामुळे तालुक्यातील बोरी अडगाव येथील बोहरपी कृषी केंद्रावर रविवारी कारवाई करण्यात आली आहे. येथे एकूण ३८३बॅग खतांचे गोडाऊन सील करून विक्रीबंद आदेश दिलेत.ही धाडसी कारवाई तालुका कृषी अधिकारी गणेश गिरी यांनी केली. यामुळे तालुक्यात खळबळ उडाली आहे.सध्या खरिपाच्या हंगामातील शेती मशागतिच्या कामानी वेग घेतला असून युरिया तसेच इतर खते देण्यासाठी शेतकरी तयारीला लागले आहेत. नेमकी हीच संधी साधून कृषी केंद्र धारक शेतकऱ्यांना अव्वाच्या सव्वा भावाने खतविक्री करतात. बोरी अडगाव येथील शेतकरी भगवान टिकार हे तेथील कृषी केंद्रात युरिया खतासाठी गेले असता त्यांना युरिया नसल्याचे सांगण्यात आले. मात्र दुकानात युरिया मोठ्या प्रमाणावर असल्याची माहिती टिकार यांना मिळताच त्यांनी रविवारी खामगाव तालुका कृषी अधिकारी गणेश गिरी यांना फोनद्वारे याबाबत माहिती दिली. या माहितीची तात्काळ दखल घेत गणेश गिरी यांनी लगेचच दुपारच्या वेळी बोरी अडगाव येथे धाव घेत त्या दुकानाची तपासणी केली.यावेळी परवान्यांमध्ये व साठा पुस्तकात किती खत आहे व कुठे ठेवलेले आहे याबाबत सविस्तर माहिती नमूद करावी लागत असते. त्याप्रमाणे साठा पुस्तकाची तपासणी केली असता ९५ बॅग युरिया होता. मात्र उपस्थित नागरिकांनी बोहरपी कृषी केंद्राचे आणखी गोडाऊन असून तेथे अवैध रित्या खताचा साठा असल्याचे सांगितले. यावरून अटाळी रोडवरील एका गोडाऊन ची तपासणी केली असता तेथे १८० बॅग युरिया व सुपर फॉस्फेट, पोटॅश यासह ३८३ बॅग खताचा अवैध रित्या आढळून आला. याबाबत कृषी केंद्र संचलकाला तालुका कृषी अधिकारी यांनी विचारणा केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. मात्र नंतर हा खत साठा त्यांचाच असल्याचे सांगण्यात आले यामुळे तालुका कृषी अधिकारी गणेश गिरी यांनी ३८३ बॅग अवैध खतसाठा असलेले गोडाऊन सील केले.तसेच हा साठा विक्रीबंद करण्याचे आदेश दिले.