राज्यावरील वाढलेला कर्जाचा बोजा, दरडोई उत्पन्नात झालेली घसरण, घटलेली परकीय गुंतवणूक या मोठ्या आव्हानांचा पार्श्वभूमीवर शुक्रवारी अर्थमंत्री अजित पवार यांनी महा विकास आघाडी सरकारचा पहिला अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पात अजित पवार यांनी शेतकऱ्यांसाठी अनेक महत्त्वाच्या घोषणा केल्या. सरकारची कर्जमाफी दीड वर्ष चालली आम्ही मात्र ती प्रक्रिया दोन महिन्यात पूर्ण करून असे म्हणत अर्थमंत्र्यांनी समोर बसलेल्या विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना टोला लगावला. महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेसाठी 22 हजार कोटींची तरतूद करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. नियमित कर्जाची फेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार प्रोत्साहनपर रक्कम देण्यात येणार असल्याची घोषणा देखील त्यांनी केली. शेतीला दिवसा वीज पुरवठा करण्यासाठी दरवर्षी एक लाख याप्रमाणे पाच लाख सौर कृषी पंप बसविण्यात येणार आहेत. या योजनेसाठी दहा हजार कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित असून यासाठी अर्थसंकल्पात 670 कोटी प्रस्तावित करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली शेतीसाठी होणारा पाणीपुरवठा दिवसा करण्यावर भर देण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला. तसेच भूजल पातळी वाढविण्यासाठी मुख्यमंत्री जलसंधारण योजना राबविण्यात येणार आहे, त्यासाठी जलसंपदा विभागासाठी १० हजार कोटींची तरतूद करण्यात आली आहे. उसासह इतर पिकांच्या ठिबक सिंचनासाठी अल्पभूधारक शेतकऱ्यांना 80 टक्के अनुदान देण्यात येईल असे अजित पवार यांनी सांगितले.
next post