खामगाव : दलित वस्तीचा निधी इतर प्रभागात वर्ग करून दलितांवर अन्याय करणाऱ्या नगर परिषद मधील विद्युत विभागातील अभियंता सतीश पुदागे यांच्यावर कारवाई करण्यात यावी याकरिता वंचित बहुजन आघाडी च्या वतीने उपविभागीय अधिकारी व न. प.चे मुख्याधिकारी यांना निवेदन देण्यात आले.

सदर दिलेल्या निवेदनात त्यांनी सांगितले आहे की, खामगाव नगर परिषदेचे विद्युत विभागात कार्यरत असलेले अभियंता सतीश पुदागे यांनी सर्व कायदे व नियम धाब्यावर बसून स्वतःच्या मर्जीप्रमाणे दलित वस्तीसाठी राखीव असलेलं निधी चिखली रोड वरील श्री दत्त मंदिर पासून बर्डे प्लॉट येथून बायपास पर्यंतच्या रस्त्यावर विद्युत पोल उभारण्यासाठी वर्ग केला. यामुळे दलित वस्तीतील होणारे कामे प्रलंबित पडले. दलितांच्या खिशाचा निधी त्यांच्या विकासासाठी वापरण्यात आला असता त्याचा त्यांनी दुरुपयोग करून व वरिष्ठांची दिशाभूल करून इतर प्रभागांमध्ये वर्ग केला आहे.

विशेष म्हणजे सदर निधी ज्या भागात वापरण्यात आलेला आहे तो भाग दलित वस्तीचा राखीव नसून इतर प्रभागात येत आहे. त्यामुळे याबाबत त्यांच्यावर योग्य ती कारवाई करण्यात यावी अशी मागणी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने करण्यात आली आहे. यावेळी वंचित चे नितीन सुर्यवंशी, अमन हेलोडे, बाळू मोरे,हर्ष खंडारे, गोलू महातो, वाहिद जमा, संजू खंडेराव, भारत इंगळे यांच्यासह वंचितचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.