बुलडाणा : कोरोना विषाणूचा होणारा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना जिल्हा प्रशासनाकडून करण्यात येत आहे. या उपाययोजनांचा एक भाग म्हणून एका ठिकाणी होणारी गर्दी टाळण्यासाठी जिल्ह्यातील सर्व किराणा दुकाने, बेकरी, भाजीपाला, फळे, दुध, कृषी संबंधीत सर्व दुकाने, पेट्रोल पंप आजपासून सकाळी ८ ते दुपारी १२ वाजेपर्यंत सुरू राहणार आहे. कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी ज्या उपाययोजना करणे आवश्यक आहे, त्या जिल्हा प्रशासनाकडून करण्यात येत आहे.
यामधून अत्यावश्यक वस्तूंची / सेवांची वाहने तसेच औषधालय वगळण्यात आली आहेत. याबाबत संबंधीतांनी दक्षता घ्यावी, गर्दी होवू देवू नये. तसेच फळांची व भाजीपाला दुकाने १०० मीटर अंतराने लावण्यात यावी आणि ग्राहकांना प्रत्येक दुकानासमोर १ मीटर अंतरावर ग्राहक उभे राहतील, यादृष्टीने ग्रामीण भागात गटविकास अधिकारी व नगर परिषद क्षेत्रामध्ये मुख्याधिकारी यांनी यासाठी चुना वापरून चिन्हांकित करावे. सदर आदेशाची तंतोतंत अंमलबजावणी करावी.
जिल्ह्यामध्ये खामगांव, शेगांव, दे.राजा, चिखली व बुलडाणामध्ये कोरोना बाधीत रूग्ण आढळून आलेले आहे. जिल्ह्यात सद्यस्थितीती एकूण ११ रूग्ण आहेत. जवळपास जिल्ह्याच्या अर्ध्या भागामध्ये बाधीत रूग्ण आहेत. सदर रोगाचा प्रादुर्भाव वाढत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे या रोगाच्या प्रसारावर नियंत्रण ठेवण्णे अत्यंत आवश्यक आहे. त्यानुसार सदर निर्णय घेण्यात आला आहे. सर्वांनी आदेशाचे पालन करावे, असे प्रशासना तर्फे आदेशान्वये कळविले आहे.
सौजन्य – DIOBULDANA