खामगाव:सार्वजनिक आरोग्य़ विभागाच्या वतीने स्थानिक सामान्य रूग्णालयात आज २८ सप्टेंबर ते १ ऑक्टोंबर २०२२ पर्यंत जिल्हास्तरीय सर्वरोग निदान वैद्यकीय व दंत शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. आज पहिल्याच दिवशी शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून पहिल्याच दिवशी ७२८ रूग्णांची तपासणी करण्यात आली असून ५४ रूग्णांवर आयुषमान भारत व महात्मा फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत विविध शस्त्रक्रिया करण्यात आल्या.आज सकाळी १० वाजताचे सुमारास आमदार ॲड.आकाशदादा फुंडकर यांचे हस्ते शिबिराचे फित कापून उदघाटन करण्यात आले. तत्पूर्वी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले. यावेळी मंचावर जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. नितिन तडस, निवासी वैद्यकीय अधिकारी बुलडाणा डॉ. यास्मिन चौधरी, अति. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. भागवत भुसारी, जिल्हा आरोग्य अधिकारी प्रशांत पाटील, खामगाव सामान्य रूग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. निलेश टापरे, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रदीप सोनटक्के, अमरावती मेडिकल कॉलेजचे प्रा. डॉ. अंकुर गुप्ता, बुलडाणा महिला व बाल रूग्णालय वैद्यकीय अधिक्षक डॉ. वासेकर,तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अभिलाष खंडारे उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनी आपल्या मनोगतातून आरोग्य शिबिराचे महत्व विषद केले.शिबिरामध्ये आज पहिल्याच दिवशी ७२८ रूग्णांची तपासणी करण्यात आली. यामध्ये अस्थिरोग, मनोरूग्ण व सामान्य रूग्णांचा समावेश आहे.
यापैकी ३५८ रूग्णांची रक्त तपासणी,१५ सोनाग्राफी, ६० एक्सरे,१५ सिटीस्कॅन करण्यात आले. तसेच हर्निया २,गर्भपिवी १ स्तनातील गाठी १,कुटूंब कल्याण शस्त्रक्रिया ५, सिझेरियन ७ शस्त्रक्रिया करण्यात आल्या तसेच या शिबिरात अमरावती डेंटल कॉलेजची दंत चिकित्सा टीम मोबाईल व्हॅनसह उपस्थित होती. यामध्ये १४२ रुग्णांची तपासणी करून ३८ रुग्णांवर शस्त्रक्रिया करण्यात आली शिबिराला जिल्ह्यातील सर्व शासकीस रूग्णालयातील तज्ञ डॉक्टर व कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभले.सदर शिबीरात आज दि.२८ सप्टेबर २०२२ रोजी रुग्ण़ तपासणी करण्यात आली. तर आवश्य़क अशा रुग्णांवर उद्या दि.२९ सप्टेंबर व दि.३० सप्टेंबर 2२०२२ रोजी शस्त्रक्रीया करण्यात येणार आहे. त्यानंतर दि.१ ऑक्टोंबर २०२२ रोजी सदरच्या शस्त्रक्रीया झालेल्या रुग्णांची फेरतपासणी सामान्य़ रुग्णालय खामगांव येथे करण्यात येणार आहे. सर्व सामान्य़ गरजू लोकांना उपचारार्थ मदत व्हावी या दृष्टीकोनातून सार्वजनिक आरोग्य़ विभागाच्या माध्यमातून जिल्हास्तरीय आरोग्य़ शिबीराचे आयोजन करण्यात आले असून या आरोग्य़ शिबीराचा सर्व गरजूंनी लाभ घ्यावा असे आवाहन सामान्य रूग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. निलेश टापरे यांनी केले आहे.