खामगांव : कोरोनाचे संकट देशावर असतांना लाॅकडाउनमध्ये संचारबंदीच्या काळात खामगांव शहरात मोठया प्रमाणात अवैध दारु विक्री होत होती. त्याबाबतची माजी आमदार दिलीपकुमार सानंदा यांनी राज्य उत्पादन शुल्क मंत्री दिलीप वळसे पाटील, गृहमंत्री अनिल देशमुख, पालकमंत्री डाॅ.राजेंद्र शिंगणे, जिल्हाधिकारी बुलडाणा सुमन चंद्रा, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे जिल्हा अधिक्षक पठारे यासह सर्व वरीष्ठांकडे तक्रार केली होती.
राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख हे दि.१९ एप्रिल २०२० रोजी जिल्हा आढावा बैठक घेण्याकरीता बुलडाणा येथे आले असता त्या बैठकीमध्ये सुध्दा सानंदा यांनी अवैध दारु विक्रीचा मुद्दा उपस्थित केला होता. त्यानंतर एका सामान्य कार्यकर्त्याच्या तक्रारी नंतर जिल्हाधिकारी बुलडाणा यांनी खामगांव शहरातील दारु दुकानाची तपासणी करण्याचे आदेश दिले होते. त्या अनुषंगाने दि. २३ व दि. २४ एप्रिल रोजी खामगांव शहरातील दारु दुकानांचे तपासणी करण्यात आली. दि.२३ एप्रिल रोजी एम.आर. चौधरी यांच्या दारु दुकानांची तपासणी केली असता दुकानात असलेल्या देशी, विदेशी दारु व बिअरच्या साठयामध्ये मोठया प्रमाणात तफावत आढळुन आली. त्या अनुषंगाने विभागीय गुन्हयाची नोंद झाल्याचे समजले होते. तदनंतर भाजप युवा मोर्चाचे सदस्य पवन गरड यांच्या परिवारातील सदस्यांच्या दारु दुकानांची तपासणी झाल्यामुळे त्यांनी आमदार आकाश फुंडकर यांच्याकडे याबाबतची तक्रार केली. तक्रार केल्यानंतर आमदार आकाश फुंडकर यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे सानंदा परिवारातील सदस्यांकडे असलेल्या प्रतिष्ठांनाची चौकशी करण्याची मागणी केली असता जिल्हाधिकारी यांनी देखील सानंदा परिवाराच्या सदस्याकडे असलेल्या ठोक व परवाने प्रतिष्ठानाच्या चौकशीचे आदेश दिले. त्या अनुषंगाने आज दिनांक २६ एप्रिल रोजी एमआयडीसी भागातील बाॅबी कंट्री लिकर तर खामगांव शहरातील आर.जी.सानंदा या दुकानांची चौकशी करण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाचे पथक खामगांव शहरात दाखल झाले होते.
जिल्हाधिकारी यांनी संचारबंदीच्या काळात अवैध दारु विकणा-यांची चौकशी करण्यासाठी दिलेल्या आदेशाचे माजी आमदार दिलीपकुमार सानंदा यांनी स्वागत केले आहे. सानंदा परिवारातील परवानाधारक, वेळेवर दुकान उघडणे, वेळेवर दुकान बंद करणे व अधिका-यांच्या इतर सुचनांचे पालन करतात असे चौकशीअंती स्पष्ट होईल व अवैध दारु विक्री करणारे कोण ? ते कोणत्या पक्षाचे पदाधिकारी व त्यांना कोणाचा आश्रय ? हे चौकशी झाल्यानंतर विभागीय गुन्हयाच्या माध्यमातून सिध्द होईल. फुंडकरांच्या तक्रारीवरुन सानंदा परिवारातील सदस्यांच्या दुकानांची चौकशी झाली तर आता फुंडकरांनी त्यांच्यात जर हिम्मत असेल तर त्यांनी भाजपा पक्षाचे जे पदाधिकारी ज्यांच्याकडे देशी, विदेशी दारु व बिअर शाॅपीचे परवाने आहेत अश्या परवाना धारकांच्या दुकानांची सुध्दा चौकशी करण्याचे लोकप्रतिनिधी या नात्याने मागणी करावी असे प्रतिआवाहनही सानंदांनी फुंडकरांना केले आहे अशी माहिती माजी आमदार दिलीपकुमार सानंदा यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे निर्भिड स्वराज्य ला दिली आहे.