जळगाव जामोद : काल रविवारी बुलडाणा जिल्हा हा कोरोना मुक्त झाल्याने सुटकेचा निश्वास घेत असतांनाच आज सोमवारी जळगाव जामोद शहरामधील एक व्यक्ती कोरोनाबाधित आढळून आल्याने एकच खळबळ उडाली. प्रशासनाकडून तो राहात असलेला बालाजी नगर परिसर हा पूर्णपणे सील करण्यात आला आहे.
जळगाव जामोद येथील दोघे भाऊ हे बऱ्हाणपूर येथे एका व्यक्तीच्या अंत्यसंस्कारासाठी ६ मे रोजी गेले होते, त्यानंतर ते जळगाव जामोदला परतले होते मात्र जो व्यक्ती वारला होता त्याचा भाचा दुसऱ्या दिवशी कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्याने, या जळगाव जामोद येथील असलेल्या दोन व्यक्तींना ९ मे रोजी खामगाव येथे हॉस्पिटल कोरेनटाईन करण्यात आले. १० मे रोजी त्यांच्या स्वॅबचे नमुने अकोला येथे तपासणीसाठी पाठविण्यात आल्यानंतर आज ११ मे रोजी सकाळी त्यातील एका व्यक्तीचा रिपोर्ट हा कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्याने या कोरोना पॉझिटिव व्यक्तीवर खामगाव येथील रुग्णालयात उपचार सुरू आहे व या घटनेने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.
दरम्यान जळगाव जामोदचा बालाजी नगर परिसर हा ४०% सील करण्यात आला असून, त्यांच्या संपर्कात कोण कोण आले त्यांचा शोध घेणे आता सुरू आहेच व त्या परिसरातील २२०० नागरिकांची प्राथमिक तपासणी करण्यात येणार आहे अशी माहिती मिळाली आहे. काल बुलडाणा जिल्ह्यात ३ जणांना डिस्चार्ज दिल्यानंतर बुलडाणा जिल्हा कोरोनामुक्त झाल्याचा आनंद औट घटकेचा ठरला आहे. यामुळे कोरोना चा धोका टळलेला नसून याचे गांभीर्य लक्षात घेऊन नागरिकांनी खबरदारी घ्यावी आणि सुरक्षित राहावे तसेच प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन निर्भिड स्वराज्य तर्फे करण्यात आले आहे.