कुठलीही जीवितहानी नाही
खामगांव : शहरातील गजानन कॉलनी व चांदमारी येथील परिसरात एका घरावर वीज पडून मालमत्ता व विद्युत उपकरणांचे नुकसान झाले असल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मुसळधार पाऊस व विजेचा मारा यामुळे अचानकपणे वीज राहत्या घरातील स्लॅब तोडून थेट घरात कोसळली आहे.
खामगांव शहरात शुक्रवारी संध्याकाळी विविध भागात मुसळधार पावसासह विजेचा जोरदार कडकडाट सुरु होता. तर खामगांवच्या बहुतांश सखल भागात पाणी साचले होते. मात्र त्याच बरोबर विजेचा तडाखे प्रचंड असल्याने त्याचा फटका गजानन कॉलनी व चांदमारी येथे राहणाऱ्या अक्षय मोरे व 7 ते 8 जणाच्या घराचे तसेच गजानन कॉलनी भागात राहणारे अंबादास जाधव व दिलीप खासने यांच्या कुटुंबियांना बसला आहे. अक्षय मोरे यांच्या घराच्या आतील बाजूचे स्लॅब तोडून वीज घरात पडली असल्याने मोरे यांनी सांगितले आहे. यामुळे मोठय़ा प्रमाणात मालमत्तेचे नुकसान झाले आहे.
घरातील इलेट्रिक उपकरणे व सिलिंग सुद्धा खराब झाली आहे तसेचअक्षय मोरे व दिलीप खासने यांच्या घरात असलेले सर्व पंखे, व फ्रिज, टी व्ही, गिझर, व इतर विद्यूत उपकरणे जळाली आहेत. तसेच अंबादास जाधव यांचे सी सी टी व्ही ही उडाले असल्याने मोठे आर्थिक नुकसान झाले आहे असे त्यांनी सांगितले आहे.यामधे सर्वांचे लाखोंचे नुकसान झाल्याचे सुद्धा त्यांनी सांगितले आहे. मात्र या घटनेमध्ये या सुदैवाने कोणतीच जीवितहानी झाली नाही. या घडलेल्या घटनेची माहिती तहसील कार्यालयाला दिली असून सदर घटनेचा पंचनामा करून योग्य ती नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी प्रशासनाकडे करण्यात आली आहे.