खामगाव: जिल्ह्यातील २७९ ग्रामपंचायतींच्या ३० डिसेंबर रोजी लागलेल्या निकालानंतर आता ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदासाठी निवडणूक होत आहे.यासाठी ६ जानेवारी ही तारीख निश्चित करण्यात आलेली आहे.ग्रामपंचायतीची प्रथम सभा ६ जानेवारी रोजी होणार असून त्यामध्ये उपसरपंचाची निवड केली जाईल.डिसेंबर महिन्यात झालेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीमध्ये सरपंचाची थेट जनतेमधून निवड करण्यात आली होती.त्यात भाजप व शिवसेनेच्या शिंदे गटाने सर्वाधिक ४३ टक्के जागा पटकावल्या होत्या तर महाविकास आघाडीने २४ टक्के आणि अपक्षांनी ३३ टक्के जागा मिळविल्या होत्या. दरम्यान ७ सरपंचाची पदे उमेदवारी अर्ज न आल्याने रिक्त राहिलेली आहेत.या ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये जिल्ह्यातील राजकारण चांगलेच तापले होते.
आता उपसरपंचाच्या निवडणुकीमुळेही ग्रामीण भागातील राजकारण तापण्यास प्रारंभ झाला आहे. ग्रामपंचायतीच्या निवडणुकीनंतरची पहिली सभा घेण्याबाबत जिल्हाधिकारी डॉ. एच. पी. तुम्मोड यांनी तहसीलदारांना २८ डिसेंबर रोजी निर्देश दिले आहेत. निवडून आलेले सदस्य सध्या उपसरपंचपदासाठी फिल्डींग लावण्यात व्यस्थ झाल्याचे एकंदरीत चित्र दिसत आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील राजकारण पुन्हा एकदा चांगलेच तापले आहे.