खामगाव : येथील अनिकट रोड सुटाळा खुर्द परिसरात राहणारे अभियंता प्रवीण ठाकरे यांच्या परिवाराच्या वतीने गौरीपूजन यानिमित्त महाराष्ट्रीयन नऊवारी लुगडे परिधान केलेल्या गौरी महालक्ष्मीचीप्रतिष्ठापणा करण्यात आली. यानिमित्त देशातील कर्तृत्ववान महिलांचे बॅनर लावण्यात आले होते. हे बॅनर आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांसाठी कौतुकाचा व चर्चेचा विषय ठरले होते. गौरीपूजना निमित्त ठाकरे कुटुंबीय दरवर्षी अभिनव उपक्रम राबवत असते. त्या माध्यमातून समाजासाठी विधायक संदेश देण्याचा ते प्रयत्न करत असतात.
मागच्या वर्षी कोरोनाने हाहाकार माजवला होता. या दरम्यान गौरी पूजनाचा सण आला त्यावेळी प्रवीण ठाकरे व त्यांच्या कुटुंबीयांनी मास्क परिधान केलेले डॉक्टर व परिचारिका तसेच सामाजिक संदेश देणारे बॅनरचा देखावा साकारण्यात आला होता, तोही चर्चेचा विषय ठरला होता. तर या उत्सवामध्ये त्यांनी कोरोना योद्ध्यांचा सत्कार सुद्धा ठाकरे कुटुंबियांकडून करण्यात आला होता.
तर यावर्षी त्यांनी गौरी पूजन व गौरी दर्शन कार्यक्रमात देशातील कर्तृत्ववान महिलांचा प्रत्येक क्षेत्रात कर्तृत्व गाजवणारा देखावा साकारला. यामधे राजमाता जिजाऊ, सावित्रीबाई फुले, झाशीची राणी लक्ष्मीबाई, मदर तेरेसा, इंदिरा गांधी, अनाथांची माय सिंधुताई सपकाळ यासह विविध क्षेत्रातील कर्तुत्ववान महिलांचे बॅनर लावण्यात आले होते. तसेच ऑलम्पिक स्पर्धेत देशाला गोल्ड, सिल्वर व ब्राँझ पदक मिळवून देणाऱ्या विजेत्या महिलांचे सुद्धा बॅनर याठिकाणी लावण्यात आले होते. मोबाईल,लॅपटॉप, वकील,डॉक्टर, पोलीस, पायलट अशा प्रत्येक क्षेत्रात पुरुषांच्या बरोबरीने कर्तृत्व गाजवणाऱ्या महिलांचे बॅनरचा दृष्य देखावा याठिकाणी लावण्यात आला होता. सर्वप्रथम यावेळी गौरी पूजनाच्या निमित्त ५ महिलांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. तर शिक्षिका, अंगणवाडी सेविका,परिचारिका, ब्युटीशियन अशा विविध क्षेत्रात काम करणाऱ्या कर्तृत्ववान महिला शिक्षिका सौ. वंदना ढगे,अंगणवाडी सेविका श्रीमती वर्षा मुक्कावार,ब्युटीशियन सौ.सीमा पाटील,रक्त पेढी तंत्रज्ञ सौ.राजश्री पाटील,ग्रामपंचायत सदस्या सौ.वर्षा डोंगरे,कमलाबाई डूकरे,सौ.मीनल ठाकरे, सौ.योगीता भोपळे, पूजा कळींककर अशा कर्तुत्ववान महिलांचा सत्कार करण्यात आला. ठाकरे कुटुंबियांकडून सत्कार सुद्धा यावेळी करण्यात आला.सोबतच याठिकाणी फोटो घेण्यासाठी इच्छुक असणार्यांसाठी घरातच सेल्फी पॉइंट ही बनवण्यात आला होता. यावेळी कर्तृत्ववान महिलांची नावे ओळखा अशी महिलांसाठी स्पर्धासुद्धा घेण्यात आली होती. यामध्ये शंभर ते दीडशे महिला व तरुणींनी सहभाग नोंदविला होता. यामध्ये जिंकणाऱ्या महिला व तरुणींना विशेष भेटवस्तू यावेळी देण्यात आली. ठाकरे व त्यांच्या कुटुंबीयांनी गौरीपूजना निमित्त सजवलेल्या उत्कृष्ट देखाव्याला पाहण्यासाठी आजूबाजूच्या परिसरातील महिला व नागरिकांनी गर्दी केली होती. त्यांच्या या अभिनव उपक्रमाबद्दल शहरातील नागरिकांकडून कौतुक होत आहे.