खामगाव : संपूर्ण जगात वेगाने फैलावत असलेल्या कोरोना विषाणूमुळे सर्व मानवजात संकटात सापडली आहे. अशा संकटाच्या प्रसंगी जगभरातील डॉक्टर आपला जीव धोक्यात घालून रुग्णसेवेत गुंतले आहेत. इतर सर्व डॉक्टरांनप्रमाणेच खामगावातील दोन डॉक्टर्स देखील कोरोना च्या संकटामध्ये रुग्णांना सेवा देत आपले कर्तव्य बजावत आहेत. टेंभूर्णा ता. खामगांव येथील डॉ. प्रियंका चेतनकुमार टीकार ह्या नागपूर येथील कोरोना अतिदक्षता विभागात अविरत सेवा देत आहेत. त्यांचे शिक्षण एम बी बी एस पूर्ण झाले असुन सध्या त्या उच्च पदवी एमडी ऍनेस्थेशिया पूर्ण करण्यासाठी नागपुर येथील स्व. इंदिरा गांधी शासकीय महाविद्यालय व मेयो हॉस्पिटल मध्ये मागील दोन वर्षा पासुन कार्य करत आहेत व त्यांचे पती श्री चेतन कुमार हे सुद्धा डॉक्टर असून त्यांनी एम एस जनरल सर्जरी चे शिक्षण पूर्ण करून लता मंगेशकर हॉस्पिटल ला वैद्यकीय सेवा देत आहेत. विशेष म्हणजे खामगाव तालुक्यातील मराठा पाटील समाजाचे ज्येष्ठ नेते श्री रमेश टीकार यांच्या त्या सुनबाई आहेत.
सोबतच खामगाव चे सुपुत्र डॉ.निखिल संजय ठाकरे पाटील हे देखील दिल्ली येथील राममोहन लोहिया हॉस्पिटल मध्ये कोरोना रुग्णांची सेवा करून शहराचे नाव उंचावत आहेत. डॉक्टर निखिल ठाकरे यांनी रशिया येथे एमबीबीएसची डिग्री घेतली असून दीड वर्षापासून ते दिल्ली येथील राममोहन लोहिया हॉस्पिटल व व्यंकटेश्वर हॉस्पिटल येथे सेवा देत आहेत. जेंव्हा पासून कोरोनाचे संकट आले तेव्हापासून ते कोरोनाच्या रुग्णांसाठी सुरू करण्यात आलेल्या आयसोलेशन वार्डात अत्यावश्यक सेवा देत आहेत.
कोरोना च्या या जगव्यापी संकटात स्वतःचा जीव धोक्यात घालून कोरोनाच्या रुग्णांची सेवा करणारे खामगावातील हे दोघेही खऱ्या अर्थाने आपले कर्तव्य बजावत आहेत व सोबतच त्यांनी खामगाव शहराचे नाव उंचावले आहे त्यामुळे दोघांचेही खामगावकरांकडून कौतुक होत आहे. डॉ. प्रियंका चेतनकुमार टीकार आणि डॉ. निखिल ठाकरे यांच्या कार्याला निर्भिड स्वराज्य चा सलाम..!