बुलडाणा : जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची वाढती संख्या बघता त्यांना सेवा देण्यासाठी फिजिशियन डॉक्टरांची कमतरता भासत आहे. त्यामुळे या राष्ट्रीय आपत्तीच्या काळात राष्ट्रीय कार्य म्हणून जिल्ह्यातील खाजगी फिजिशियन डॉक्टरांनी शासकीय कोविड रुग्णालयात आपली सेवा देऊन शासनाला सहकार्य करावे असे भावनिक आवाहन पालकमंत्री ना डॉ राजेंद्र शिंगणे यांनी केले आहे.जिल्हा सामान्य रुग्णालयात आयोजित टास्क फोर्स आढावा बैठकी दरम्यान बोलत होते. या बैठकीला प्रभारी जिल्हाशल्यचिकित्सक डॉ एस डी घोलप, डॉ बी एस भुसारी, डॉ असलम, डॉ प्रशांत बडे, डॉ गजेंद्र निकम, डॉ सचिन वासेकर, डॉ प्रशांत पाटील,डॉ आर एस उंबरकर उपस्थित होते.कोरोना या महामारीने संपूर्ण जगामध्ये हाहाकार घातला असल्याचे सांगत पालकमंत्री डॉ राजेंद्र शिंगणे म्हणाले,आपल्या देशात देखील कोरोनाची तीच परिस्थिती आहे. हे राष्ट्रीय संकट असून गेल्या सहा महिन्यापासून केंद्र सरकार असो कि राज्य सरकार या संकटाचा आपापल्या परीने मुकाबला करत आहे. कोरोना योद्धा ज्यांना आपण म्हणतो ते सर्व लोक रात्रंदिवस आपली सेवा देऊन या लढाईत उतरलेले आहे. परंतु यापेक्षाही मोठी लढाई ही येणाऱ्या दिवसात लढावी लागणार आहे. त्याकरिता मोठ्या प्रमाणात योद्ध्यांची गरज लागणार असून सध्या जिल्ह्यात फिजिशियन डॉक्टरांची मोठ्या प्रमाणात कमतरता भासत आहे. त्यामुळे जिल्ह्यातील जे फिजिशियन डॉक्टर्स आहेत, त्यांनी स्थानिक शासकीय कोविड रुग्णालयात काही दिवस आपली सेवा देऊन या राष्ट्रीय कार्यात आपला सहभाग नोंदवून शासनाला सहकार्य करणे गरजेचे आहे. त्यामुळे जिल्ह्यातील फिजिशियन डॉक्टर्संनी पुढे येऊन आपली सेवा द्यावी असे आवाहन डॉ शिंगणे यांनी केले आहे. तसेच जिल्ह्यातील कोरोना टेस्ट कमी होत असून त्या जास्तीत जास्त वाढवाव्या त्यासाठी कालबद्ध कार्यक्रम आखावा. जिल्ह्यातील कोरोनाची नेमकी काय स्थिती आहे, किती लोकांना कोरोना होऊन गेला याची माहिती होण्यासाठी जिल्ह्यात सिरो सर्वेक्षणासाठी प्रस्ताव तयार करावा, रेमेडिसिवीर इंजेक्शनचा आवश्यक साठा जिल्ह्यात उपलब्ध असून अत्यावश्यक असल्यासच त्याचा वापर करावा अशा महत्वपूर्ण सूचना यावेळी पालकमंत्री डॉ शिंगणे यांनी यावेळी दिल्या. पालकमंत्री डॉ.राजेंद्र शिंगणे यांच्या प्रयत्नातून जिल्ह्यामध्ये आरटीपीसीआर लॅब सुरु झाली आहे. सध्या या लॅबमध्ये दररोज २०० ते २५० सॅम्पल टेस्ट करण्यात येत असून उर्वरित सॅम्पल हे अकोला, अमरावती येथे पाठवावे लागतात. परंतु आता बुलडाणा येथील आरटीपीसीआर लॅब पूर्ण क्षमतेने सुरु झाली असून उद्यापासून जिल्ह्यातील सॅम्पल हे जिल्ह्यातच तपासले जाणार आहेत. तर आरटीपीसीआर लॅबची क्षमता ही १००० पर्यंत वाढविण्यात यावी अशा सूचना पालकमंत्री डॉ.राजेंद्र शिंगणे यांनी दिल्या आहेत.