‘बाप्पू’ च्या नावाने कर्मचारी फोडतात खडे
खामगाव : वरीष्ठ अधिकारी यांचा आपल्या गोपनीय कामासाठी अनिधस्त कर्मचाऱ्या पेक्षा खाजगी व्यक्ती वरच अधिक भिस्त व विश्वास असतो. त्यासाठी ते खाजगी व्यक्तीला झिरो पोलीस म्हणून नेमणूक करून प्रत्येक गोष्टीची खबराखबर घेत असतात.येथील एसडीपीओ कार्यालयात सुद्धा ‘बाप्पू’ वरचढपणे वागत असल्याने नाका पेक्षा मोती जड होत असल्याचे बोलले जात असून कर्मचारी बाप्पूच्या नावाने खडे फोडत असल्याचे दिसून येत आहे.
वास्तविक पाहता साहेबाने नेमणूक दिलेल्या खाजगी व्यक्तीच्या कामाच्या काही मर्यादा असतात. पण बाप्पू ने सर्व काही सीमा ओलांडल्या असल्याचे बोलले जाते.कर्मचाऱ्यांना कामाचे आदेश देणे,त्यांनी केलेल्या कामाचा आढावा घेणे वेळेप्रसंगी त्यांच्या कामात अवाजवी हस्तक्षेप करणे तसेच सूत्रांकडुन मिळालेल्या माहीतीनुसार अजून एक धक्कादायक बाब समोर आली आहे, ती म्हणजे पोलीस विभागाच्या अधिकृत कार्यालयीन कामकाजाच्या व्हॉट्स ऍप ग्रुप मध्ये देखील या तोतया व्यक्तीचा समावेश करण्यात आला आहे.बाहेरील व्यक्तीस कार्यालयीन कामकाजाच्या ग्रुप मध्ये देखील सामावून घेणे येवढे अधिकार देण्यामागे काय उद्देश आहे असे विविध प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहेत, त्यामुळे बाप्पू सध्या चर्चेचा विषय बनला आहे. दरम्यान एक अवैध धंदे वाल्या कडून बाप्पू वसुली करीत असतानाचा व्हिडिओ व्हायरल झाल्याने चांगलीच चर्चा रंगली होती. पण बाप्पू हा साहेबांनी नेमलेला माणूस असल्यामुळे कोणीही कर्मचारी त्याचे विरोधात बोलण्यास धजावत नाही. पण बाप्पू कर्मचाऱ्यांच्या सहनशीलतेचा गैरफायदा घेऊन त्यांना डिवचत आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांचे मनोबल खच्चीकरण होऊन त्याचा कामावर विपरीत परिणाम होत असल्याने ‘भिक नको पण कुत्रा आवरा’ अशी स्थिती एसडीपीओ कार्यलयातील कर्मचाऱ्यांची झाली असल्याचे दबक्या आवाजात बोलले जात आहे. तेव्हा साहेबांनी बाप्पू ला लगाम लावून आवर घालावा अशी मागणी सुद्धा काही कर्मचाऱ्यांकडून खाजगीत करण्यात येत आहे. या गंभीर बाबीची कर्तव्यदक्ष जिल्हा पोलीस अधीक्षक सुनील कडासने यांनी दखल घ्यावी जेणेकरून पोलीस कर्मचाऱ्यांना मनमोकळेपणाने आपले कर्तव्य बजावता येईल अशी चर्चा पोलीस वर्तुळात होत आहे.
प्रकरणा बाबत माहिती घेतो-अपर पोलीस अधीक्षक अशोक थोरात… या संदर्भात अपर पोलीस अधीक्षक अशोक थोरात यांना विचारणा केली असता सदर प्रकारा बाबत माहिती घेणार असल्याचे त्यांनी निर्भिड स्वराज्य सोबत बोलतांना सांगितले.