खामगांव : कोरोनाच्या या महामारीमुळे केंद्र सरकारने व राज्य सरकारने दि. २३ मार्च २०२० पासून एस.टी. बस सेवा बंद करण्याचा निर्णय घेतलेला आहे. सदर निर्णयामुळे एस.टी. महामंडळाचे दररोज २२ कोटी रुपयाचे उत्पन्न बुडत असून २१०० कोटी रूपयांचे आर्थिक नुकसान झाले आहे. तसेच एसटीच्या आर्थिक परिस्थितीमुळे मे महिन्याचे ५० टक्केच वेतन देण्यात आले या पार्श्वभूमीवर एसटी महामंडळास आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यात यावे यासह विविध मागण्यांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी आज १ जुलै रोजी एसटी बचाव-कामगार बचाव आंदोलन तहसीलदार कार्यालयसमोर महाराष्ट्र एसटी वर्कर्स काँग्रेस (इंटक) संघटनेच्या वतीने करण्यात आले.
दर्जेदार सेवा देण्याच्या दृष्टीने मागण्यांची पूर्तता करून एस.टी. महामंडळास आर्थिक सहाय्य करून सक्षम करण्याची मागणी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मा. ना. उध्दवजी ठाकरे यांच्याकडे महाराष्ट्र एसटी वर्कर्स काँग्रेस (इंटक) संघटनेच्या वतीने तहसीलदार यांच्या मार्फत निवेदन मागणी केली यावेळी महाराष्ट्र एसटी वर्कर्स काँग्रेस इंटक खामगाव आगार बुलडाणा विभागाचे अमरावती प्रादेशिक सचिव विकास तिवारी, विभागीय उपाध्यक्ष श्रीधर शहाणे, आगार अध्यक्ष रामेश्वर ठाकरे, आगार सचिव शेख इमरान, आगार कार्याध्यक्ष शहेजाद शेख, आगार प्रतिनिधी संतोष पांढरे, अमोल माठे, दादासाहेब वानखेडे आदी उपस्थित होते.