जळगांव जामोद : ग्रामीण भागात एक – दोन साप दिसले तर फारसे गांभिर्याने घेतलं जात नाही. मात्र, एकावेळी एका पाठोपाठ १३२ साप निघाले तर ही घटना आश्चर्यकारक च मानली जाते. असाच काहीसा प्रकार बुलडाणा जिल्ह्य़ातील जळगांव जामोद तालुक्यातील पिंपळगाव काळे येथे घडला आहे. ३० एप्रिल रोजी सायंकाळी ७ वाजता येथील ग्रामपंचायतच्या नालीचे बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणी चार ते पाच साप असल्याचे काही तरुणांच्या निदर्शनास आले होते व त्या तरुणांनी त्या सापांना मारून टाकले. मात्र थोड्या वेळातच काही व्यक्तींना आणखी साप आढळून आले. तेवढ्यात च गर्दी जमून उपस्थित नागरिकांनी ग्रामपंचायतच्या नालीचे बांधकाम खोदायला सुरुवात केली असता एकापाठोपाठ ३० ते ४० साप आढळून आले होते. त्यानंतर १ मे सायंकाळी ७ वाजे पर्यंत एकूण १३२ साप आढळून आले आहेत आणि धक्कादायक म्हणजे गावामध्ये सर्पमित्र उपस्थित नसल्याने भितीपोटी या सर्व सापांना गावातील नागरिकांनी मारून टाकले आहे. हे मेलेल्या साप चे फोटो पाहून हे साप पानदिवड जातीचे असल्याचे सर्प मित्र यांनी सांगितलं आहे.
विशेष म्हणजे अजूनही त्या ठिकाणी आणखी साप निघतच आहेत व रात्री सापांच्या भीतीमुळे नागरिकांनी आपल्या घराजवळ मोठे लाईट देखील लावले आहेत. अशी माहिती गावातील राजेश काळे यांनी निर्भिड स्वराज्य सोबत बोलताना दिली आहे. ग्रामपंचायत किंवा वन विभागाच्या वतीने यावर उपयोजना केल्या जाव्यात अशी मागणी या गावातील नागरिकांकडून होत आहे.