शेगाव : येथून जवळ असलेल्या चिंचोली गावाच्या फाट्यावर ५० ते ५५ वर्षाच्या इसमाचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळल्याने एकच खळबळ माजली आहे. सदर मृतदेह हा फाट्याजवळ असलेल्या एका झाडाखाली झोपलेल्या अवस्थेत दिसून आला. या मृतदेहावरून दुर्गंधी येत असल्याने काही नागरिकांनी तात्काळ त्या ठिकाणी जाऊन पाहणी केली असता अनोळखी इसमाचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत त्यांना दिसून आला नागरिकांनी लगेच शेगाव ग्रामीण पोलीस स्टेशनला कळवून या बाबत माहिती दिली. सदर मृतदेह हा भंगार गोळा करणारा किंवा भिकारी असल्याचा संशय व्यक्त केल्या जात आहे. कारण की फाट्याजवळ असलेल्या चिंचोली बस स्थानकाच्या आत मध्ये त्या व्यक्तीचे काही सामान, कपडे एका गाठोड्यात बांधून ठेवलेले तेथे आढळून आले. यामध्ये असा सुद्धा एक संशय व्यक्त केला जातो की, गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात उन्हाचा पारा अधिक तीव्र जाणवू लागला आहे,या व्यक्तीचा मृत्यू हा उन्हामुळे झाला असावा असल्यास संशय व्यक्त करण्यात येत आहे. या घटनेची माहिती मिळताच शेगाव ग्रामीण पोलीस स्टेशनचे कर्मचारी घटनास्थळावर दाखल झाले होते व मृतदेहाचा पंचनामा करुन येथील सामान्य रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. शेगाव ग्रामीण पोलिसांकडून या अनोळखी मृतदेहाची ओळख पटवण्याचे आवाहन सुद्धा करण्यात आले आहे.
previous post