जिल्ह्यातील एकूण कोरोना बाधितांची संख्या १५९ वर
बुलडाणा : जिल्ह्यात गत २१ दिवसात९१ व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्या आहेत. जिल्ह्यातील एकूण बाधित रुग्णसंख्येच्या तुलनेत ५६ टक्के रुग्ण हे जून महिन्यात आढळून आले असून, सरासरी दररोज चार व्यक्ती जिल्ह्यात पॉझिटिव्ह आढळून येत असल्याचे चित्र आहे. सध्याजिल्ह्यात १५९ कोरोनाबाधित रुग्णांची नोंद असून, त्यापैकी ३८ रुग्णांवर आयसोलेशन कक्षात उपचार करण्यात येत आहेत. दरम्यान, अकोला येथील प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या अहवालांपैकी ६३ अहवाल रविवारी प्राप्त झाले. त्यापैकी ५३ अहवाल निगेटिव्ह आले असून, आठ अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. कोरोना पॉझिटिव्ह अहवाल आलेल्यांमध्ये मलकापूर येथील लक्ष्मीनगर येथील ५५ वर्षीय व्यक्ती,पातुर्डा (ता. संग्रामपूर) येथील ३७ वर्षीय महिला आणि संग्रामपूर येथील ३३ वर्षाचा पुरुष, दोन वर्षाची मुलगी आणि ३८ वर्षीय महिलेचा यात समावेश आहे. शेगाव येथील जोगडी फैल भागातील चार महिन्याचे बाळही पॉझिटिव्ह असून, खामगावातील एक व्यक्तीही पॉझिटिव्ह आली आहे.दुसरीकडे मलकापूर शहरातील हाशीमनगरतील ५५ वर्षीय व्यक्तीचा १६ जून रोजी मृत्यू झाला होता. त्याचा कोरोना पॉझिटिव्ह अहवाल रविवारी आला. त्यामुळे बुलडाणा जिल्ह्यातील कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या आता आठ झाली आहे.या व्यतिरिक्त अकोला येथील रुग्णालयात उपचार घेत असलेल्या शेगाव येथील एका महिलेचाही मृत्यू झाला आहे. २० जून रोजी या महिलेचा मृत्यू झाला असून, १९ जून रोजी तिला अकोला रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते.नांदुरा तालुक्यातील वाडी येथील महिलेचाही रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. या महिलेचा पती आधीच पॉझिटिव्ह आला होता मात्र या रुग्णांची ज्या डॉक्टरांनी तपासणी केली त्या डॉक्टरसह त्यांच्या स्टाफचा रिपोर्टही निगेटिव्ह आहे. त्यामुळे नांदुराकरांनी सुटकेचा निश्वास सोडला.रविवारी पाच जणांनी मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे यात मलकापुरातील हेडगेवार नगरात राहणारा 36 वर्षीय व्यक्ती शास्त्रीनगर मधील 27 वर्षीय महिला व आठ महिन्याच्या बाळाचा समावेश आहे. याव्यतिरिक्त मलकापूर तालुक्यातील धोंगर्डी येथील 70 वर्षीय वृद्ध महिला व 67 वर्षीय पुरुषानेही कोरोनावर मात केली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 2171 रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. जिल्ह्यात एकूण 159 कोरोनाबाधित रूग्ण आहेत. आतापर्यंत 114 कोरोनाबधीत रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. आजपर्यंत एकूण निगेटिव्ह अहवाल 2171 आहेत.