December 28, 2024
ब्लॉग

PPE सूट घातल्यानंतर सहा-सात तास खाणं तर सोडाच पाणी सुद्धा पिता येत नाही..

बुलडाणा जिल्ह्यातील कोरोनाशी लढत असलेल्या डॉक्टरने मांडला अनुभव

मी डॉ दीपक मुंढे, केईएम हॉस्पिटलमध्ये कनिष्ठ निवासी डॉक्टर म्हणून कार्यरत आहे, मी व माझे कित्येक सहकारी केईएम, कस्तुरबा हॉस्पिटल, सेवन हिल्स हॉस्पिटल, नायर हॉस्पिटल इत्यादी ठिकाणी कोविड ड्युटीवर आहेत.मी जवळपास महिनाभर या कोरोना ड्युटीवर होतो. मला नुकताच ब्रेक मिळाला आहे. आम्ही दिवसा सहा-आठ तासांच्या व रात्री १२ तासांच्या शिफ्टमध्ये काम करतो, या भूतो न भविष्यती वैद्यकीय आणीबाणीच्या काळात अहोरात्र वैद्यकीय सेवा पुरवत आहोत. गेल्या काही दिवसांपासून,एका भयंकर शारीरिक व मानसिक विवंचनेतून आम्ही जात आहोत, विशेषतः ड्युटीवर असताना PPE (Personal Protective Equipment) घातल्यानंतर या कठीण काळाचे गांभीर्य अधिकाधिक जाणवायला लागते, PPE Donning (घालणे) आणि Doffing (काढणे) चे नियम आहेत ते पाळणे बंधनकारक आहे व संसर्गाचा धोका कमी करण्यात महत्त्वाचे आहे.

PPE घातल्यानंतर असताना सहा-सात तास खाणं तर सोडाच साधं पाणी सुद्धा पिता येत नाही, शिफ्ट दरम्यान लघवीला जाणे सुद्धा शक्य होत नाही.आम्ही सर्व जवळपास २४-३० या वयोगटातील आहोत, परंतु वयस्कर किंवा मधुमेह इत्यादी व्याधींनी ग्रस्त कर्मचारी,नर्सिंग स्टाफ यांच्या त्रासाची कल्पनाही करवत नाही.मुंबईची गरमी दिवसेंदिवस वाढत जात असल्याने व कोरोनाचा प्रादुर्भाव AC मध्ये होण्याचा जास्त धोका असल्याने म्हणून दवाखान्यात AC बंद ठेवल्या जात आहेत, डोक्याच्या केसांपासून ते पायाच्या नखापर्यंत  झाकलेल्या या वॉटरप्रूफ पीपीई किटमध्ये घामाने कित्येक वेळा अंघोळ होऊन जाते, रात्री बारा तासांच्या ड्युटी मध्ये हा त्रास असह्य होतो परंतु संसर्गाचा धोका व प्रत्येक शिफ्टमध्ये फक्त एकच PPE दिल्या जात असल्याने आणि त्याची अगोदरच प्रचंड कमतरता असल्यामुळे दुसरा पर्यायही उरत नाही.चेहऱ्याला N-95 मास्क, त्यावर 3 Ply सर्जिकल मास्क आणि त्यावर घातलेल्या चेहरा झाकण्याच्या प्लास्टिकच्या कव्हर मुळे निट श्वासही घेता येत नाही, प्रचंड गुदमरल्यासारखे होते त्यामुळे थकवा डोकेदुखी व इतर समस्या उद्भवतात, श्वास सोडण्याच्या प्रक्रियेत गॉगलवर धुकं जमा होतं म्हणून समोर पाहणेही अंधुक होते. याही परिस्थितीत सतत अलर्ट राहून येणाऱ्या प्रत्येक पेशंटला संभाव्य धोका समजून त्यावर दिलेल्या नियमावलीप्रमाणे उपचार करून पटापट निर्णय घ्यावे लागतात, दररोज सुमारे 250 रुग्ण आम्ही तपासतो,कित्येक रुग्ण केवळ घाबरल्यामुळे आमच्याकडे येतात त्यांना हे सगळं समजून सांगणे अति अवघड होते कारण आमचा आवाज त्यांच्यापर्यंत पोहोचत नाही, ओरडून ओरडून बोललं तरच आवाज त्यांच्यापर्यंत पोहोचतो, ओरडल्यामुळे घसा पार कोरडा होतो त्यात पाणी पिण्याची सोय नाही म्हणून हा तोंड दाबून बुक्क्याचा मार असहाय्यतेच्याही पलिकडे जातो.

मी केईएम मार्ड चा हंगामी अध्यक्ष आहे म्हणून महाराष्ट्रातील इतर रुग्णालयात काम करणारे निवासी वैद्यकीय अधिकारी मित्र संपर्कात असतात, आम्ही संबंध सारख्याच अवस्थेमधून सर्व जात आहोत, आमच्या अनेक अडचणी आहेत परंतु हा अडचणी सांगण्याचा वेळ नाही म्हणून मिळेल त्या परिस्थितीत परिस्थितीत आम्ही सर्व रोज जीवन-मरणाची लढाई लढत आहोत, माझ्यासोबत काम करणाऱ्या माझ्या काही मित्रांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे, इतर अनेक रुग्णालयामध्ये डॉक्टर, आरोग्य कर्मचा-यांना संसर्ग झाल्याचे आकडे वाढत आहेत.एक एमबीबीएस डॉक्टर तयार होण्यासाठी सुमारे सहा वर्षाचा कालावधी लागतो, स्पेशलिटी-सुपर स्पेशलिटी डॉक्टर तयार होण्यात किमान तपभर लागतो. विश्व आरोग्य संघटनेच्या मानकाप्रमाणे दर 1000 रुग्णांमागे एक डॉक्टर असे असताना आपल्याकडेही परिस्थिती 10926 रुग्णांमागे एक एमबीबीएस डॉक्टर इतकी दुर्भाग्यपूर्ण आहे म्हणून त्यांच्या जीवाची काळजी घेणे, त्यांच्या अडचणी समजून घेवून त्यांचे निराकरण करण्यासाठी शासन, प्रशासन, रुग्णालय प्रशासन या सर्वांनी अधिक लक्ष घालून या काम करणाऱ्या डॉक्टर, Interns, नर्सिंग स्टाफ, सफाई कर्मचारी यांच्याकडे विशेष लक्ष देवून ते अधिक तत्परतेने सोडवले पाहिजे कारण केवळ आजच्या संकटाचीच सोडवणूक नव्हे तर उद्याच्या भारताची आरोग्यव्यवस्था मजबूत ठेवण्याचे अग्निदिव्यही सरकारला पार पाडावेच लागणार आहे.मी मुळ बुलढाणा जिल्हा, लोणारच्या चिखला या गावातला, जवाहर नवोदय विद्यालयात झालेल्या शिक्षणामुळे गावातील मी पहिलाच एमबीबीएस डॉक्टर, वैद्यकीय व शैक्षणिक पार्श्वभूमी नसणाऱ्या माझ्या अतिसामान्य कुटुंबातील पालकांना याबद्दल विशेष माहिती नाही परंतु 24*7 चालणाऱ्या निरर्थक बातम्या व अतिरंजक गोष्टींमुळे केवळ माझेच नाही तर माझ्यासोबत काम करणाऱ्या सर्वांचे पालक आतून हादरुन गेले आहेत, फोनवरील संभाषणातून त्यांच्या कातर आवाजातील चिंता मला कळते म्हणून शक्य होईल तितक्या वेळेस व्हिडिओ कॉल द्वारे संपर्कात राहण्याचा आम्ही प्रयत्न करतो, या ड्युटीच्या अगोदर मी ग्रामीण भागात पोस्टींगवर होतो काही सुट्ट्या बाकी असल्याने घरी जाऊन यायची तयारी होती कारण दिवाळीपासून घरी जाणे झाले नाही परंतु या अचानक लागलेल्या ड्युटी मुळे ते शक्य झाले नाही.

मुंबईत कोरोनाचा झालेला प्रादुर्भाव व मुंबईची एकंदरीत परिस्थिती लक्षात घेता हा धोका मुंबईतून कधी संपेल याची निश्चित शाश्वती ब्रह्मदेवालाही देता येणार नाही.TRP साठी हपापलेला भरकटलेला मीडिया, अनियंत्रित सोशल मीडिया, व आमिर खान,अक्षय कुमार इ. चित्रपट कलाकारांमुळे जनसामान्यांमध्ये डॉक्टरांविषयी वा आरोग्य व्यवस्थेविषयी प्रचंड गैरसमज, अविश्वास व भ्रामक कल्पना निर्माण झालेल्या आहेत‌.ज्या व्हेंटीलेटरला आपण कायमच बदनाम करत आलो आहोत, मुळात रुग्णाला मृत्यूशय्येवरून वापस आणणाऱ्या व्हेंटिलेटरपेक्षा सुंदर मशीन या जगात अस्तित्वात नाही,असूच शकत नाही व त्याचीच कमतरता अमेरिकेसारख्या देशाला सुद्धा भासत असल्यामुळे मोठमोठ्या वाहन कंपन्या देखील व्हेंटिलेटर निर्माण करण्यासाठी युद्धस्तरावर काम करत आहेतरुग्ण बरा होण्यासाठी डॉक्टरांच्या Skills पेक्षा डॉक्टर-पेशंट यांच्यामधील विश्वास महत्वाचा असतो.या कोरोना मुळे उद्भवलेल्या भूतो न भविष्यती वैद्यकीय आणिबाणीच्या परिस्थितीत आपल्या जीवाची तमा न बाळगता लढणाऱ्या डॉक्टर, नर्सिंग स्टाफ व कर्मचाऱ्यांना बघून त्यांच्याविषयीचा आदर व जनसामान्य व आरोग्यव्यवस्थेमधील हरवत चाललेला विश्वास-संवाद पूर्वपदावर येवून त्याचे रूपांतर भारताच्या आरोग्य व्यवस्थेत एकंदरीत सकारात्मक बदलात होतील असा आशावाद बाळगूया किमान डॉक्टर व वैद्यकीय कर्मचाऱ्यांवर होणारे हल्ले कमी होतील असा आशावाद बाळगायला नक्कीच हरकत नाही.लवकरच माझी सुट्टी संपून मी पुन्हा कामावर रुजु होईल आपण सर्वांनी मात्र घरीच राहुन, सरकार व डॉक्टरांनी घालून दिलेले नियम काटेकोरपणे पाळून या संसर्ग रोकथामाच्या प्रयत्नात मदत करण्यासाठी बांधील असलं पाहिजे…

डॉ दीपक मुंढे (केईएम रुग्णालय, मुंबई) ८०८७१०८४२३


८०८७१०८४२३ (WhatsApp)

Related posts

मला काही बोलायचं आहे

nirbhid swarajya

गटविकास अधिकारी चंदनसिंग राजपूत यांची मोताळा पंचायत समिती बदली…

nirbhid swarajya

ज्ञानगंगापूर येथे शालेय विद्यार्थीनीच्या वाढदिवसा निमित्त केले वृक्षारोपण…

nirbhid swarajya
error: Content is protected !!