ख्राईस्टचर्च कसोटीच्या पहिल्या दिवशी यजमान न्यूझीलंडने आपलं वर्चस्व निर्माण केलं आहे. भारतीय संघाने केलेल्या २४२ धावांना उत्तर देताना दिवसाअखेरीस न्यूझीलंड बिनबाद ६३ धावांपर्यंत पोहोचले. सलामीवीर टॉम लॅथम २७ तर टॉम ब्लंडल २९ धावांवर खेळत आहे. भारतीय गोलंदाजांनी न्यूझीलंडची सलामीची जोडी फोडण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्टा केली, मात्र त्यांचे प्रयत्न अपुरेच पडले. त्याआधी, मोक्याच्या क्षणी केलेल्या हाराकिरीचा फटका भारतीय फलंदाजांनी संघाला बसला. चहापानाच्या सत्रानंतर भारतीय संघाची न्यूझीलंडच्या माऱ्यासमोर अक्षरशः घसरगुंडी उडाली, ज्यामुळे पहिल्या दिवशी भारतीय संघ २४२ धावांत गारद झाला. न्यूझीलंडच्या गोलंदाजांनी खेळपट्टीचा पुरेपूर फायदा उचलत भारतीय फलंदाजांना मोठी धावसंख्या उभारण्याची संधीच दिली नाही. कसोटी मालिकेत ०-१ ने पिछाडीवर पडलेल्या भारतीय संघाने दुसऱ्या कसोटी सामन्यात आश्वासक सुरुवात केली. मुंबईकर पृथ्वी शॉने झळकावेल्या अर्धशतकी खेळाच्या जोरावर भारताने पहिल्या दिवशी उपहाराच्या सत्रापर्यंत २ बाद ८५ पर्यंत मजल मारली. पावसाने व्यत्यय आणलेल्या सामन्यात न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसनने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पहिल्या कसोटीत अपयशी ठरलेल्या पृथ्वीने या सामन्यात आपल्या फलंदाजीत बदल करत चांगले फटके खेळले. मात्र ट्रेंट बोल्टने मयांक अग्रवालला माघारी धाडत भारताला पहिला धक्का दिला. यानंतर पृथ्वीने चेतेश्वर पुजाराच्या सोबतीने भारतीय संघाचा डाव सावरला. न्यूझीलंडच्या गोलंदाजांचा नेटाने सामना करत पृथ्वीने काही सुरेख मैदानी फटके खेळले. निल वँगरच्या गोलंदाजीवर षटकार खेचत पृथ्वीने आपलं अर्धशतकही साजरं केलं. पुजारासोबत दुसऱ्या विकेटसाठी केलेल्या अर्धशतकी भागीदारीमुळे भारताचा डाव सावरला. मात्र अर्धशतकी खेळीचं मोठ्या खेळीत रुपांतर करण्यात पृथ्वीला अपयश आलं. जेमिनसनच्या गोलंदाजीवर टॉम लॅथमने पृथ्वीचा सुरेख झेल टिपला.उपहाराच्या सत्रानंतर टीम इंडियाचे महत्वाचे फलंदाज झटपट बाद झाले. विराट ३ धावांवर साऊदीच्या गोलंदाजीवर तर रहाणे ७ धावांवर माघारी परतला. मात्र चेतेश्वर पुजारा आणि हुनमा विहारीने संयमी खेळी करत भारताची अधिक पडझड थांबवली. पाचव्या विकेटसाठी दोन्ही फलंदाजांनी ८१ धावांची भागीदारी केली. चेतेश्वर पुजाराने यादरम्यान आपलं अर्धशतकं साजरं केलं. पाठोपाठ हनुमा विहारीनेही अर्धशतक झळकावलं. चहापानाच्या सत्राआधी हनुमा विहारी वँगरच्या गोलंदाजीवर माघारी परतला. त्याने ५५ धावांची खेळी केली.चहापानाच्या सत्रानंतर पुन्हा एकदा भारतीय फलंदाजांनी हाराकिरी केली. चेतेश्वर पुजारा मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात जेमिसनच्या गोलंदाजीवर माघारी परतला. यानंतर एकामागोमाग एक फलंदाज माघारी परतत राहिले. अखेरच्या फळीत मोहम्मद शमीने फटकेबाजी करत भारताला २४२ धावांपर्यंत मजल मारुन दिली. न्यूझीलंडकडून जेमिसनने ५, टीम साऊदी-ट्रेंट बोल्टने २ तर निल वँगरने १ बळी घेतला.