विद्यार्थ्यांसमोर दोन पर्याय
नवी दिल्ली : सीबीएसई म्हणजेच सेकंडरी बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशनने 1 ते 15 जुलै दरम्यान होणाऱ्या दहावी आणि बारावीच्या परीक्षा रद्द केल्या आहेत. सीबीएसई बोर्डाने आज सर्वोच्च न्यायालयात ही माहिती दिली कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या परीक्षा घेण्यास महाराष्ट्र,दिल्ली आणि तामिळनाडू या राज्य सरकारांनी परीक्षा घेण्यास असमर्थता दर्शवली होती विद्यार्थ्यांना अतंर्गत मूल्यांकनावरून दिलेला निकाल स्वीकारणं किंवा सर्व परिस्थिती सुरळीत झाल्यावर पुन्हा परीक्षा देणं हे पर्याय असल्याचंही सीबीएसईमार्फत स्पष्ट करण्यात आलं या दोन्हीमधून एका पर्यायाची निवड करण्याचं स्वातंत्र्य विद्यार्थ्यांना असणार आहे.
आज सर्वोच्च न्यायालयात सीबीएसई परीक्षांविषयी सुनावणी झाली. सीबीएसई पाठोपाठ आयसीएसई बोर्डानेही दहावीच्या परीक्षा रद्द केल्या आहेत. याआधीच्या सुनावणीत, कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता सीबीएसईने दहावी-बारावीच्या परीक्षा रद्द करण्याचा पर्याय पडताळून पाहावा असं सर्वोच्च न्यायालयानेही सीबीएसई बोर्डाला सुचवलं होतं. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती जेएम खानविलकर यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठासमोर या प्रकरणाची सुनावणी झाली. दहावीच्या परीक्षा पूर्णपणे रद्द तर बारावीच्या विद्यार्थ्यांना अंतर्गत मूल्यांकनाच्या आधारे लागणारा निकाल मान्य नसेल तर पुन्हा परीक्षा देण्याचा पर्याय ठेवण्यात आला आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निर्णय
सीबीएसईच्या दहावी आणि बारावीचे निकाल 15 जुलै पर्यंत जाहीर करावेत असंही सर्वोच्च न्यायालयाने सीबीएसीला सांगितलं. आधीच्या नियोजनानुसार 1 जुलै ते 15 जुलै दरम्यान सीबीएसई दहावी आणि बारावीच्या उर्वरीत पेपरची परीक्षा घेण्याचं जाहीर करण्यात आलं होतं. त्याला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आलं होतं. दहावी-बारावीच्या परीक्षा रद्द करण्याच्या निर्णयानंतर आयसीएसईनेही परीक्षा रद्द करत असल्याचं जाहीर केलं. कोरोना व्हायरसच्या प्रतिबंधासाठी लॉकडाऊन लागू केल्यानंतर सीबीएसई आणि आयसीएसईच्या दहावी आणि बारावी परीक्षांचे काही विषयांच्या परीक्षा होणं बाकी होतं. ICSE बोर्डाने CBSE च्या पावलावर पाऊल ठेवत परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला असला तरी सीबीएसईप्रमाणे बारावीच्या विद्यार्थ्यांना फेरपरीक्षेचा पर्याय देण्यात आलेला नाही. आयसीएसईने दहावी आणि बारावीच्या उर्वरीत विषयाच्या परीक्षा रद्द केल्या आहेत सीबीएसईच्या दहावीच्या विद्यार्थ्याचं मूल्यांकन मागील तीन परीक्षांमधील गुणवत्तेवर होणार आहे.