बुलडाणा : जिल्ह्यात कोरोनाचा वाढता संसर्ग पाहता यापूर्वीच नगर परिषदांचे क्षेत्र प्रतिबंधीत क्षेत्र म्हणून घोषीत करण्यात आले आहे. तसेच प्रतिबंधीत क्षेत्र वगळून सर्व प्रकारचे बाजार, बाजारपेठ क्षेत्रातील दुकाने ही सोमवार ते शुक्रवार नियमितपणे सकाळी 9 ते सायं 5 वाजेपर्यंत सुरू आहेत. मात्र शनिवार व रविवारला होणारी गर्दी लक्षात घेता जिल्हादंडाधिकारी एस रामामूर्ती यांनी संचारबंदीचे प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहे. त्यानुसार जिल्ह्यात दुध विक्रेते, दुध वितरण केंद्र सकाळी 6 ते दुपारी 3 व सायं 6 ते रात्री 9 वाजे पर्यंत नियमितपणे सुरू असतील. या औषधी सेवा, दवाखाने, रूग्णवाहिका सेवा, एस टी वाहतूक 50 टक्के प्रवासी क्षमतेसह, माल वाहतूक, पेट्रोल पंप 24 तास सुरू असतील. टायर पंक्चरची दुकाने नियमित सुरू असतील. पुर्वनियोजीत परीक्षा वेळापत्रकानुसार होतील. बँकाचे कामकाज त्यांचे नियमित वेळेनुसार सुरू राहील. या व्यतिरिक्त अन्य सर्व दुकाने, आस्थापना, प्रतिष्ठाने बंद राहतील. सदर आदेश जिल्ह्यात 12 मार्च रोजी सायंकाळी 6 पासून ते 15 मार्च 2021 चे सकाळी 8 वाजेपर्यंत लागू राहील. या कालावधीत संचारबंदी लागू असल्याने नागरिकांना विनाकारण बाहेर फिरण्यास मनाई राहील. आदेशाचे उल्लंघन केल्यास भारतीय दंड संहिता 1860 चे कलम 188, आपत्ती व्यवस्थापन कायदा व साथरोग प्रतिबंधात्मक कायद्याअन्वये कार्यवाही करण्यात येईल, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे. नागरीकांनी आवश्यकता नसल्यास घराबाहेर पडू नये. कोरोना संसर्ग नियमांचे पालन करावे, असे आवाहनही जिल्हा प्रशासनाने केले आहे.