मुंबई : राज्यात करोना रुग्णांच्या वाढत्या आकडय़ांनी दहा महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर सुरू झालेल्या शिक्षण क्षेत्रासमोर पुन्हा संकट उभे केले आहे. रुग्णवाढीचा आलेख असाच राहिल्यास दोन दिवसांआधी राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने जाहीर केलेल्या इयत्ता दहावी व बारावीच्या लेखी परीक्षांच्या संभाव्य वेळापत्रकावर संकट उद्भवण्याची भीती शिक्षण मंडळातील अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे.
विशेष म्हणजे, करोनामुळे पुन्हा परीक्षा पद्धतीमध्ये किंवा वेळापत्रकात बदल झाल्यास कमी मनुष्यबळावर काम करणाऱ्या शिक्षण मंडळालाही नियोजनासाठी कसरत करावी लागणार आहे.
करोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा प्रथमच परीक्षा फेब्रुवारी-मार्चऐवजी एप्रिल-मे या कालावधीत होणार आहे. बारावीची लेखी परीक्षा 23 एप्रिल ते 21 मे 2021 या कालावधीत, तर दहावीची लेखी परीक्षा 29 एप्रिल ते 20 मे या कालावधीत होणार आहे. मात्र, मागील आठ दिवसांपासून राज्यात करोना रुग्णांच्या संख्येत रोज वाढ होत आहे. त्यामुळे विदर्भातील अमरावती, अकोला आणि यवतमाळमध्ये बाधित क्षेत्र जाहीर करण्यात आले. औरंगाबाद जिल्ह्य़ामध्ये सुरू झालेल्या इयत्ता पाचवी ते आठवीपर्यंतच्या शाळा करोनाच्या धडकीने पुन्हा बंद करून ऑनलाइन वर्ग सुरू करण्यात आले. इयत्ता दहावी आणि बारावी हे विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची पुढील दिशा ठरवण्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे वर्ष असते. मात्र, करोना रुग्णांच्या वाढत्या संख्येने वेळापत्रकात बदल झाल्यास विद्यार्थ्यांच्या अभ्यासाचे नियोजन बिघडणार आहे. शिवाय लेखी परीक्षा ही तीन तासांची असल्याने संक्रमणाच्या भीतीने पालक चिंतीत झाले आहेत.
previous post